मुंबई : ‘मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झाडे कापण्यासाठी झालेली दडपशाही म्हणजे हिटलरशाही असून पंतप्रधानांना हुंदका फुटला नाही व मुख्यमंत्रीही अस्वस्थ झाले नाहीत,’ असा  हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चढवला. तर आमच्या दोन आमदारांना भाजपने आपल्या चिन्हावर लढवण्याची खेळी करून फसवणूक केल्याचे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी सोडल्याने महायुतीमध्ये भाजपविरोधात महाकुरबुरी सुरू झाल्याचे चित्र आहे.

मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी रात्री झाडे कापण्यावरून आंदोलन सुरू झाले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विटरचा वापर करत भाजपवर निशाणा साधला. आमच्या डोळ्यांसमोर संपूर्ण जंगल मारले जात आहे, त्याबद्दल ना पंतप्रधानांना हुंदका फुटला ना मुख्यमंत्री अस्वस्थ झाले! असे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधणारे पहिले ट्वीट उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.सरकारने रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे जे पाप केले त्याचा हिशेब द्यावा लागेल, अशी आव्हानात्मक भाषा दुसऱ्या संदेशात वापरली. झाडांना मतांचा अधिकार नाही. तो असता तर मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विनाचौकशी तुरुंगात टाकण्याचे आदेश सरकारने आणि न्यायालयाने दिले असते. आरेच्या बाबतीत ती दडपशाही सुरू आहे. ती हिटलरशाहीच आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.