संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. राज्यातील २८८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांचा उत्साह दिसत आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सकाळीच आपला हक्क बजावला. यामध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील मतदान केलं. तसंच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

“आताच मत देऊन आले. मतदान हा आपला हक्क नाही तर ती जबाबदारी आहे. त्यामुळे घराबाहेर पडा आणि मत व्यक्त करा, मतदान करा”, असं म्हणत रेणुका शहाणे यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे,अतुल कुलकर्णी , सुनील बर्वे या मराठी कलाकारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. तर राधाकृष्ण विखे-पाटील, प्रशांत ठाकूर, सुप्रिया सुळे, अजित पवार या सारख्या राजकीय नेत्यांनीही मतदान केलं आहे.