शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार हंगामा झाल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांची ओळख करून देत असताना भाजपाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी घेतलेली शपथ योग्य नसल्याचंही ते म्हणाले. कामकाजादरम्यान भाजपा आमदारांकडून सभात्याग करण्यात आला. तसंच सभागृहाचं कामकाज हे संविधानानुसार चालत नसल्याचं फडणवीस म्हणाले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये जोरदार हंगामा झाल्याचं पहायला मिळालं. भाजपाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजी केली. तसंच यावेळी मंत्र्यांचा परिचय सुद्धा योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरही आक्षेप घेतला. देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष कधीही निवडण्यात आले नाही. हंगामी अध्यक्ष बदलण्याची गरज काय पडली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली. नियम, कामकाज धाब्यावर बसवून विधीमंडळाचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मागच्या वेळी राष्ट्रगीत झाल्यानं अधिवेशन संपलं होतं. नव्या अधिवेशनासाठी समन्स काढणं आवश्यक होतं.परंतु ते काढलं नाही. त्यामुळे हे अधिवेन असंवैधानिक आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. मंत्र्यांची शपथविधीची घटना ही राज्यपालांच्या अखत्यारितली असल्यानं त्यावर काहीही भाष्य करणार नाही, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

अधिवेशनाच्या सुरूवातीला कामकाजाची सुरूवात वंदे मातरमनं का केली नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच हे अधिवेशन नियमांप्रमाणे होत नसल्याचं सांगत हे अधिवेशन नियमबाह्य असल्याचं म्हटलं. परंतु सात दिवसांच्या आत अधिवेशन बोलावता येत असल्याचं सांगत सध्या अधिवेशन नियमानुसारच होत असल्याचं वळसे-पाटील म्हणाले. सध्याचे अधिवेशन नियमानुसार होत असल्याचं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आक्षेप फेटाळून लावले.