राज ठाकरे यांचा हल्ला

सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचा दावा करत असले तरी गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले. ते काय होते, असा सवाल करत ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारवर भ्रष्ट राजवटीचा ठपका फडणवीस ठेवतात त्याच सरकारमधील ढीगभर नेत्यांना भाजपमध्ये घेतले हा राजकीय वर्तनातील आणि वैचारिक भ्रष्टाचारच आहे, अशी टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत केली.

* राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन कसे कराल? कोणत्या गोष्टींवर सरकार अपयशी ठरल्याचे वाटते?

या सरकारने सत्तेवर येताना आणि नंतरही इतकी आश्वासने दिली की, त्या मानाने राज्याची फार काही प्रगती झाल्याचे दिसत नाही. वारेमाप घोषणा हेच या सरकारचे सर्वात मोठे काम. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ६५०० कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ती घोषणा हवेतच विरली. ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर केले. पण नंतर ती संख्या निम्म्यावर आली. आताही लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणजे एकंदर वाट्टेल ती आश्वासने देऊन ठेवल्याने अपेक्षा प्रचंड वाढल्या.

* काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या भ्रष्ट सरकारला पर्याय म्हणून गतिमान-पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त सरकार दिल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?

खरे तर फडणवीस सरकारने प्रसारमाध्यमांचे आभार मानायला हवेत की, त्यांच्या सरकारने-मंत्र्यांनी जो भ्रष्टाचार केला तो त्या प्रमाणात बाहेर नाही आला. हे सरकार भ्रष्टाचारमुक्त आहे तर मग चिक्की प्रकरण काय होते? सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित संस्थेचे कर्जप्रकरण, अनुदान लाटण्याचा प्रयत्न हे सारे काय होते? महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विधानसभेत कागदपत्रांनिशी जमिनीच्या व्यवहाराबाबत आरोप झाले. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

* लोकसभा निवडणुकीत तुम्ही विरोधी आवाज म्हणून पुढे आलात. सभांना गर्दी झाली. आताही होत आहे. मात्र गेल्या काही काळात तिचे मतांमध्ये रूपांतर होताना का दिसत नाही?

२००९ मध्ये लोकसभा-विधानसभा आणि नंतरच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांत या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर झाले होते हे विसरले जाते. केवळ २०१४ व त्यानंतरच्या काळाकडे पाहू नका. प्रत्येक राजकीय पक्षाच्या वाटचालीत असा काळ येतो. मनसे त्या अवस्थेतून गेली आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराला काँग्रेस आव्हान देईल, असे लोकांना वाटत होते. पण तसे झाली नाही. मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही कारण तशी तयारी नव्हती. पण मी सभा घेऊन मोदी-शहा राजवटीला विरोध केला. लोकांनी त्यास प्रतिसाद दिला. पक्षात चैतन्य आले आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले. त्यातूनच आता आम्ही विधानसभा निवडणूक लढवत आहोत. लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करत असल्याचा आरोप झाला, पण तसे नव्हते. मी भाजपही नाही तर केवळ मोदी-शहा यांच्या कारभाराच्या पद्धतीला वैचारिक विरोध करत होतो. पु. ल. देशपांडे, दुर्गाबाई भागवत यांनीही आणीबाणीला विरोध केला होता. तसेच होते ते.

* तुम्ही राजकीय विचार मांडण्यात प्रभावी ठरता, पण मनसेची राज्यभरात संघटनात्मक बांधणी करण्याबाबत उदासीन दिसता असा एक आक्षेप घेतला जातो त्याचे काय?

गेल्या पाच वर्षांत मला दोन गोष्टी उमजल्या. पहिली म्हणजे यशाला बाप खूप असतात व पराभवाला सल्लागार खूप असतात. दुसरे यश मिळत असताना चुकीची गोष्टही बरोबर ठरते, तर अपयशात बरोबर गोष्टही चुकीची ठरते. मनसेचे जाऊ द्या, पण देशावर ६० हून अधिक वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसची परिस्थिती काय आहे? कुठे गेली त्यांची संघटना? त्यामुळे राजकीय यश मिळवताना त्याचा फार काही संबंध नाही. पक्षाच्या वाटचालीत काही चुका झाल्या, त्रुटी राहिल्या. निवडणुका संपल्या की त्या त्रुटी दूर करण्यात येतील.

’राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुम्ही मुलाखत घेतल्यानंतर तुमचे व पवारांचे सूर जुळले, अशी चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीपासून तुम्ही सरकारच्या विरोधात प्रचार करू लागलात, कारण तुमचे व काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही समीकरण असल्याची टीका सुरू झाली. त्याबद्दल काय सांगाल?

महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे. त्यात विरोधकाला शत्रू मानण्याची पद्धत नाही. दिवंगत प्रमोद महाजन-शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे-शरद पवार यांच्यात मैत्री होती व त्यांनी ती कधी लपवली नाही. या मैत्रीचा परिणाम राजकीय विचारांवर होत नाही. राजकीय विरोध कायम ठेवून परस्परसंबंध चांगले ठेवले जातात. इतकेच कशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी चांगले संबंध नाहीत का? त्यामुळे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या कल्पनेनुसार पवारांची मुलाखत घेतली याचा अर्थ मी त्यांच्या राजकारणात सामील झालो असे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसह कधीही आघाडीची बोलणी मी केली नाहीत. मुळात त्या दोन्ही पक्षांतील नेत्यांशी माझा फारसा संबंध आला नाही. याउलट शिवसेनेत असल्यापासून वर्षांनुवर्षे भाजपच्या नेत्यांशीच जास्त संबंध आला. दिवंगत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासोबत व इतर अनेक नेत्यांशी मैत्री झाली. मोजके अपवाद वगळले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एखाद्या कार्यक्रमात गाठीभेटी झाल्या, तरी सहज गप्पा होत नाहीत. मला अवघडल्यासारखेच वाटते.

’विरोधी पक्षासाठी म्हणून मनसेला मतदान करा अशी भूमिका घेण्याचा विचार कसा आला?

राजकीय परिस्थिती काय आहे, पक्षाचा आवाका काय आहे हे सारे पाहून भूमिका घ्यायची असते. आम्ही १०४ उमेदवार राज्यभरात उभे केले आहेत. बहुमताला १४५ लागतात. सत्तेसाठी मतदान करा असे आवाहन करणेच हास्यास्पद ठरले असते. सध्या राज्यात विरोधी पक्षच कमकुवत असल्याचे वातावरण असल्याने मनसे सरकारला जाब विचारणाऱ्या प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका वठवू शकतो. आमचा हा वास्तववादी विचार लोकांना पटत आहे असे प्रतिसादावरून वाटते.

’युवा सेनेचे नेते आणि तुमचे पुतणे आदित्य ठाकरे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तुम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नाही. तुमचे पुत्र अमित ठाकरे यंदा निवडणूक प्रचारात उतरले आहेत. भविष्यात ते निवडणूक लढवतील का?

आता पक्ष वेगळे असले तरी आदित्य ठाकरे हा आमच्या घरातला मुलगा आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात उमेदवार उभा करण्याचा प्रश्नच नव्हता. राहता राहिला प्रश्न अमितचा. तर तो आता निवडणुकीच्या प्रचारात फिरत आहे. उद्या त्याला निवडणूक लढवावीशी वाटली तर तो ठरवेल. सर्वस्वी त्याचाच निर्णय राहील. पण लढवायची असेल तर पुढील पाच वर्षे त्याला त्यासाठी तयारी करावी लागेल. त्यातही मानसिक तयारी महत्त्वाची. मीही म्हणालो होतो, पण ते नंतर झाले नाही. कारण आमच्या ठाकरे घराण्याचा पिंड वेगळाच आहे. मी ज्या वातावरणात वाढलो त्यात निवडणूक लढवणे वगैरे जमत नाही.