३० मतदारसंघांत शिवसेना-भाजप; काँग्रेस आघाडीच्या पदरात सहा जागा, तर सहा जागी मनसे दुसऱ्या स्थानी

जीएसटी, नोटाबंदी अशा विविध कारणांमुळे देशात मंदीचे वातावरण निर्माण झाल्याची ओरड सुरू असली तरी, देशाच्या आर्थिक राजधानीने मात्र, पुन्हा एकदा शिवसेना-भाजप महायुतीच्या झोळीत मतांचे भरभरून दान केले. मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी ३० जागांवर विजय मिळवत युतीने दिवाळी साजरी केली. मात्र, वांद्रे पूर्वतील अनपेक्षित विजयासह सहा जागांवर विजय मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शहरातील काही भागांत अजूनही आपले अस्तित्व असल्याचे दाखवून दिले. मुंबईत मनसेच्या हाती एकही जागा लागली नसली तरी, सहा मतदारसंघांमध्ये या पक्षाने दुसरे स्थान पटकावले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईचा गड कोण राखणार याची उत्कंठा मुंबईकरांना लागली होती. अखेर गुरुवारी मुंबईमधील ३६ पैकी १६ मतदारसंघांत भाजपचे कमळ फुलले, तर १४ मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकला. चार मतदारसंघांमध्ये मतदाराने काँग्रेसच्या हाताला साथ दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले. प्रचारसभांमध्ये सत्ताधाऱ्यांवर तोफ डागणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला मुंबईतील एकाही मतदारसंघात विजय मिळविता आला नाही. मात्र शिवडी, माहीम, घाटकोपर-पूर्व, भांडूप-पश्चिम, मागाठाणे आणि मुलुंड या मतदारसंघांमध्ये मनसे दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

मुंबईमधील वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणूक लढवीत असल्याने अनेकांचे लक्ष येथे लागले होते. गुरुवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली आणि हळूहळू मतमोजणीच्या एकेक फेऱ्यांचे निकाल जाहीर होऊ लागले, आर्थिक राजधानीत युतीचीच दिवाळी तसतसे मुंबईकरांची उत्कंठा वाढत होती. मुंबई शहरातील १० मतदारसंघांपैकी कुलाबा, मलबार हिल, वडाळा, वांद्रे-पश्चिम मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर शिवसेनेने शिवडी, वरळी, माहीम मतदारसंघ राखले, तर गेल्या निवडणुकीत एमआयएमने धक्का देत विजय मिळविलेला भायखळा मतदारसंघात यावेळी शिवसेनेचा भगवा फडकला. काँग्रेसने मुंबादेवी मतदारसंघ राखला. त्याचबरोबर ‘मातोश्री’च्या अंगणात वांद्रे-पूर्वमध्ये शिवसेनेला स्वपक्षाच्या बंडखोरामुळे पराभव पत्करावा लागला.

कालिदास कोळंबकर यांचा आठवा विजय

चार वेळा सेनेतून आणि तीन वेळा काँग्रेसमधून निवडून आल्यानंतर यंदा २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढताना कालिदास कोळंबकर यांचा पुन्हा विजय झाला. कोळंबकर यांना ५६ हजार ४८५ मते मिळाली. तर वडाळ्यातून दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या शिवकुमार लाड यांना २५ हजार ६४० आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले अनंत प्रभू यांना १५ हजार ७७९ मते आहेत. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तेव्हा कोळंबकरही त्यांच्यासोबत बाहेर पडले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या मिहीर कोटेचा यांनी कोळंबकरविरोधात चांगलीच लढत दिली होती.

मुंबईतून पाच महिला आमदार

मुंबईत विधासभा निवडणुकीत ३६ पैकी पाच जागांवर महिला उमेदवारांनी बाजी मारली. त्यात मनीषा चौधरी (भाजप), विद्या ठाकूर (भाजप), भारती लवेकर (भाजप), यामिनी जाधव (शिवसेना) आणि वर्षां गायकवाड (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

पहिला ‘ठाकरे’ विधानसभेत

दक्षिण मुंबईमधील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवीत असल्यामुळे सर्वाचे लक्ष तेथे लागले होते. आदित्य ठाकरे यांना ८९,२४८ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांना २१,८२१ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या मतदारसंघात तब्बल ६३०५ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला.

सर्वाधिक मतांचे मानकरी

बोरिवली मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार सुनील राणे यांना सर्वाधिक म्हणजे १,२३,७१२ मते मिळाली असून त्यांचा ९५,०२१ मताधिक्याने विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार कुमार खिलारे यांना २८,६९१ मते मिळाली.

चारकोपमधील भाजपचेच उमेदवार योगेश सागर यांनी १,०८,२०२ मते मिळवीत ७३,७४९ मताधिक्क्य़ घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे कालू बुधेलिया यांना ३४,४५३ मते मिळाली. – मलबार मतदारसंघातील भाजप उमेदवार मंगलप्रभात लोढा यांना ९३,५३९, जोगेश्वरी -पूर्वमधील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना ९०,४०१, मागाठाणे येथील शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांना ९०,२०६, तर वरळीचा गड लढविणारे आदित्य ठाकरे यांना ८९,२४८ मते मिळाली.

भाजपच्या मनीषा चौधरी, मिहीर कोटेचा, अतुल भातखळकर, पराग अळवणी, विद्या ठाकूर, शिवसेनेचे दिलीप लांडे, सुनील प्रभू यांच्या पारडय़ातही मतदारांनी भरभरून मते टाकली.

चांदिवलीत अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचा विजय

चांदिवलीमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान आणि शिवसेनेचे दिलीप लांडे यांच्यातील लढत शेवटच्या फेरीपर्यंत रंगली. या चुरशीच्या लढतीत अवघ्या ४०९ मतांची आघाडी घेत दिलीप लांडे विजयी झाले. दिलीप लांडे यांना ८५,८७९ मते मिळाली असली तरी त्यांचे प्रतिस्पर्धी मोहम्मद आरिफ खान यांनी ८५,४७० मते मिळवत कडवी झुंज दिली.