राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं भयंकर पाप भाजपा-शिवसेना करत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन आठवडे सुरू असलेला सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. भाजपा नेत्यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली असून, मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. दरम्यान अॅटर्नी जनरल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असून महाराष्ट्रातील राजकीय पेचावर राज्यपालांना मार्गदर्शन करणार आहेत.

धनंजय मुंडे यांनी राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर टीका करताना म्हटलं आहे की, “जनतेने बहुमत दिलं असतानाही सत्ता स्थापन करत नसतील तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याचं पाप भाजपा, शिवसेना करत आहे. फक्त मुख्यमंत्रीपदासाठी जे काही भांडण सुरु आहे त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं मोठं पाप होत आहे”.

“तुम्ही निवडणुकीत महायुती म्हणून मतं मागितली, प्रचार केला. आणि आता महाराष्ट्रात सत्ता स्थापन कोणी करायची हा पोरखेळ का लावला आहे?,” अशी विचारणा धनंजय मुंडे यांनी केली आहे. सध्या पहिले तुम्ही, पहिले तुम्ही सुरु आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

“सत्तेत बसण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची चर्चा राष्ट्रवादीत नाही. आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे, त्या तयारीत आहोत,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी म्हटलं की, “राष्ट्रवादीच्या आमदारांना कोणी फोन केला आहे असं मला वाटत नाही. माझ्यापर्यंत तरी सध्या अशी कोणतीही माहिती नाही. पण तसे झाल्यास भाजपाला परिणाम भोगावे लागतील. निवडणुकीच्या आधी याचा तोटा त्यांना झाला आहे”. “राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत. फोडाफोडीच्या राजकारणाला राष्ट्रवादी भुलणार नाही,” असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

“महाराष्ट्रातील जनता वेगवेगळ्या संकटाला सामोरं जात असताना सरकारने जनतेच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना आर्थिक उभारणीसाठी सरकार हवं आहे ते जनेतेने दिलं आहे, पण ते स्थापन होत नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रावरील संकट पाहता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानतंर संकट वाढतील,” अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.