पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खारघरमधील प्रचारसभेत प्रतिपादन

आठ महिन्यांपूर्वी माझ्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच सेवा सुरू होणार आहे, तर २२ किलोमीटर लांबीच्या न्हावा-शेवा-शिवडी सागरी मार्गावरून वाहने धावणार आहेत. पनवेल ठाण्यात मेट्रोचे जाळे पसरणार आहे. दोन लाख घरांची निर्मिती होत आहे. कोटय़वधी रुपयांच्या महामुंबई क्षेत्रात सुविधा निर्माण होणार असून त्यामुळे उद्योग-व्यवसाय करणे सोपे जाणार आहे. पर्यायी या भागात रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होणार असल्याने आधुनिक भारताचे कोकण हे नवीन केंद्र निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथे केले.

कोकणातील महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी खारघरमध्ये आले होते. या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि माजी मंत्री गणेश नाईक उपस्थित होते.

त्या वेळी त्यांनी कोकणचे महत्त्व अधोरेखित केले. कोकणात कोटय़वधी खर्चाच्या आधुनिक पायाभूत सुविधांच्या योजना सुरू असून यापूर्वीच्या सरकारने त्या गुंडाळून ठेवल्या होत्या, अशी टीका मोदी यांनी केली. कोकण हे आधुनिक भारताचे नवीन आर्थिक केंद्र राहणार असल्याचे कोकणवासीयांनी लिहून ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. सागरमाला विकास योजनेंर्तगत समुद्र आणि रस्ते यांची कनेक्टिव्हिटी तयार केली जात असून सागरी आर्थिक क्षेत्र निर्माण केले जात आहेत.  त्यासाठी रो-रो सारख्या सागरी सुविधादेखील निर्माण केल्या जात आहेत. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात नवीन जेट्टी तयार केल्या गेल्या आहेत. सागरी विकासामुळे सागरी पर्यटन वाढणार असून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ब्लू इकॉनॉमी’ हे नवीन भारताची ओळख राहणार असून समुद्री संपत्तीचे संशोधन आणि संवर्धन झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोकणाला मिळालेल्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याचे महत्त्व सांगताना त्यांनी कोळी बांधवांवर समुद्राच्या संरक्षणाची जबाबदारी टाकली.

देशातील मच्छीमार हे समुद्र आणि त्यातील संपत्तीचे चौकीदार आहेत. त्यामुळे त्या समुद्राचे संवर्धन करताना तो प्लास्टिकमुक्त कसा राहील याची काळजी मच्छीमारांनी घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले. ठाणे व रायगड जिल्ह्य़ात असलेल्या कोळी बांधवांची संख्या पाहता पंतप्रधानांनी मच्छीमारांचा आर्वजून उल्लेख केला. राज्य शासनाच्या वतीने रायगड जिल्ह्य़ात अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्यात विमानतळ, मेट्रो, महागृहनिर्मिती, यांची माहिती देताना पंतप्रधानांनी ऐरोली, बेलापूर, कल्याण, डोंबिवली, पेण यांसारख्या झपाटय़ाने नागरीकरण वाढणाऱ्या छोटय़ा शहरांचा उल्लेख अनेकांच्या भुवया उंचावणारा होता. पुढील महिन्यात बेलापूर ते पेंदार या सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गाची घोषणादेखील पंतप्रधानांनी केली.