नागपूर : भाजप सोडताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे काँग्रेस नेते नाना पटोले हे साकोलीतून निवडणूक लढत असून त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साकोलीत १३ ऑक्टोबरला सभा घेणार आहेत.

२०१४ मध्ये पटोले भंडारा-गोंदियातून भाजपकडून निवडून आले होते. त्यानंतर तीनच वर्षांत त्यांचे पक्षनेतृत्वाशी ओबीसीच्या मुद्दय़ांवर मतभेद झाले. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मतभेद विकोपाला गेल्यावर पटोले यांनी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुका होत्या. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत पटोले यांनी गुजरातमध्येही भाजप विरोधात प्रचार केला होता. २०१८ मध्ये झालेल्या भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस रिंगणात नव्हती. मात्र पटोले यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यामुळे ते विजयी झाले.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत पटोले यांना नागपूरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते पराभूत झाले तरी त्यांनी घेतलेली मते लक्षणीय होती.आता विधानसभा निवडणुकीत पटोले त्यांच्या पारंपरिक साकोली (जि. भंडारा) या मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्या विरुद्ध भाजपने राज्यमंत्री व मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे. फुके हे मूळचे नागपूरचे आहेत. पटोले भाजपमध्ये असताना त्यांनी फुके यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मदत केली होती, हे येथे उल्लेखनीय. मात्र आता हे दोघेही साकोलीत परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.