28 May 2020

News Flash

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कडवे आव्हान

गेल्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका उंडाळकर आणि अतुल भोसले अशीच लढत झाली होती.

पृथ्वीराज चव्हाण व अतुल भोसले

लक्षवेधी लढत : दक्षिण कराड

विजय पाटील, कराड

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत असताना या खेपेसही त्यांच्यासमोर काँग्रेसचेच बंडखोर नेते विलासकाका उंडाळकर आणि भाजपचे तगडे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे आव्हान आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर बंडखोरीबरोबरच पक्षफुटीनेही संकट उभे केले आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कराड उत्तरचा ४० टक्के तर, दक्षिणमधील अपवाद वगळता अन्य भाग मिळून नवा कराड दक्षिण मतदारसंघ उदयास आला. कराड उत्तरला माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाणांच्या तर कराड दक्षिणला थोर विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाचा, विचारांचा वारसा आहे. कराड दक्षिणमध्ये आजवर यशवंतराव मोहिते, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर व सध्याचे पृथ्वीराज चव्हाण असे तीनच लोकप्रतिनिधी झाले. हे तिघेही काँग्रेसचे दिग्गज नेते राहिल्याने कराड दक्षिण म्हणजे काँग्रेस असेच समीकरण तयार झाले.

राज्यात काँग्रेसचा चेहरा म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले जाते. यंदा पृथ्वीराजबाबांसमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे. पृथ्वीराजबाबांच्या काही समर्थकांनीच निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये केलेला प्रवेश आणि अतुल भोसले हे तगडे विरोधक या सर्वाचा सामना यंदा चव्हाणांना करावा लागत आहे. डॉ. अतुल भोसले रोज एक नवी चाल्रचून आपली उमेदवारी अधिक प्रभावी ठरवत आहेत. तर विलासकाकांचे पुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील हेही बंड करत संघर्षांस उतरले आहेत.

काँग्रेस आणि अलीकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा यंदा गाजला तो या दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांच्या घाऊक पक्षांतरांमुळे. काँग्रेसच्या सातारा जिल्ह्य़ाध्यक्षानेच भाजपमध्ये प्रवेश केला. या साऱ्या घडामोडींमुळे पृथ्वीराजबाबांच्या संघटनात्मक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. हाच धागा पकडत उंडाळकरांनी ‘पृथ्वीराजांनी राष्ट्रवादी संपवण्याच्या नादात काँग्रेसही संपवली’ असा निशाणा नुकताच साधला. मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी केलेल्या जवळपास दोन हजार कोटींच्या विकासकामांचा मोठा आधार पृथ्वीराजबाबांना निवडणुकीत राहणार आहे. पण, काँग्रेसमधील फूट, बंडाळी ही त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी आहे.

अतुल भोसले यांनी अनेकांना काँग्रेसमधून भाजपमध्ये खेचून आणल्यामुळे, तसेच गेल्या दोन-तीन वर्षांत विकासकामांचा धडाका लावल्याने, तसेच, धक्कातंत्रामुळे सध्या हवा तयार केली आहे. पृथ्वीराज यांच्यासारखा नेता विरोधी बाकावर असल्यास सत्ताधाऱ्यांची पंचाईत होते. यातूनच चव्हाण यांना शह देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी भोसले यांच्या मागे सारी ताकद उभी केली आहे.

गेल्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका उंडाळकर आणि अतुल भोसले अशीच लढत झाली होती. यंदाही उंडाळकरांचा मुलगा हा बदल सोडला तर लढत सारखीच आहे. मागच्या वेळी पृथ्वीराज चव्हाणांना साडेसोळा हजारांचे मताधिक्य मिळाले होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने परिस्थितीत खूप मोठा बदल झालाआहे. या सर्व आव्हानांवर पृथ्वीराजबाबा कसे मात करतात यावरच त्याचे यश अवलंबून असेल.

चव्हाण यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मांडला होता. लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास दिल्लीही नाही आणि मुंबईही गमवावी लागेल यातूनच चव्हाण यांनी विधानसभेचाच पर्याय निवडला. यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविणे त्यांच्यासाठी निर्णायक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2019 3:52 am

Web Title: prithviraj chavan face tought challenge in karad south constituency zws 70
Next Stories
1 कोकण विकासात उद्धव यांचे योगदान काय?
2 उमेदवारांच्या वचननाम्यात विकासकामांवर भर
3 स्थानकांत स्ट्रेचर हमालांची वानवा
Just Now!
X