विधानसभेसाठी राज्यभरात मतदान होत आहे. मात्र, निवडणुकीच्या घोषणेपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील आणखी एका मतदारसंघातील दोन उमेदवार ऐन मतदानाच्या दिवशी समोरासमोर आले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

बीड शहरातील इंदिरा माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रात होत असलेल्या मतदानाबाबत संदीप क्षीरसागर यांनी संशय घेत बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला. या बाबतीत थेट मतदारांना अडवून दमदाटी केली, असे व्हिडीओमधून दिसत आहे.

दरम्यान, संदीप क्षीरसागर यांनी पाटोदा मतदारसंघांमधून बीड मतदारसंघांमध्ये मतदानासाठी बोगस मतदार आणल्याचा आरोप केला आहे. शिक्षण संस्थेवरील कर्मचाऱ्यांसह २० लोकांची यादी दाखवत आहेत. मात्र मतदार यादीत नाव असेल तर मतदानापासून रोखू नये, असे जिल्हाअधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले आहे.