आज (शनिवार) दुपारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांची मतदेखील जाणून घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. आज दुपारी १२ वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडणार असून या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा कल जाणून घेणार आहेत. तसंच यानंतर शिवसेनेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

निकालानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. भाजपबरोबर जागावाटपाचे सूत्र आधीच ठरले होते. पण भाजपची अडचण समजून घ्या, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने कमी जागांचा प्रस्ताव मान्य केला. प्रत्येक वेळी भाजपच्या अडचणी समजून घेता येणार नाहीत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये शिवसेनेला निम्मा वाटा हवा, असे स्पष्ट केलं होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, असे विचारता ‘तुमच्या तोंडात साखर पडो’, अशी ‘मार्मिक’ टिप्पणी ठाकरे यांनी केली. समान सत्तावाटपाचे सूत्र पारदर्शकपणे ठरल्यानंतरच सरकार स्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाईल, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, शिवसेनेतील अनेक जण आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यासाठी उत्सुक असल्याची माहितीही समोर आली आहे. तसंच गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपाने शिवसेनेला दिलेल्या वागणुकीची, तसंच यावेळी सत्तेतील वाट्याची भूमिकाही या बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.