ओमी कलानी यांच्या मिरवणुकीत भाजपचे नगरसेवक सहभागी

उल्हासनगर महापालिका निवणुकीत केवळ शिवसेनेला धक्का द्यायचा या हेतूने कलानी कुटुंबीयांना जवळ घेण्याचा भाजप नेत्यांचा निर्णय विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या अंगलट येऊ लागला आहे. भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले कलानी समर्थक नगरसेवकांचा मोठा गट शुक्रवारी ओमी कलानी यांच्या मिरवणुकीत सहभागी झालेला दिसला.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कलानी कुटुंबाला भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलेल्या ज्योती कलानींना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ज्योती कलानी यांचा पुत्र ओमी कलानी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अर्ज भरला. यावेळी भाजपच्या महापौर आणि ओमी यांच्या पत्नी पंचम कलानी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे भाजप उमेदवार कुमार आयलानी यांचा अर्ज भरते वेळी भाजपचे अवघे सात नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे कलानी कुटुंबाकडून भाजपला वेठीस धरल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत होते.

राष्ट्रवादीचे तीन उमेदवार

भाजपने तिकीट नाकारल्याने पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरत ज्योती कलानी यांनी त्या पक्षाचे तिकीट मिळवले, तर शुक्रवारी ओमी कलानी यांनी आणि भरत राजवानी-गंगोत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे नेमका राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. भरत गंगोत्री यांना विचारले असता, मला पक्षाने अर्ज दिला होता. त्यानुसार मी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तर मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असून तांत्रिकदृष्टय़ा माझाच अर्ज अधिकृत असल्याचा दावा ओमी कलानी यांनी केला आहे. त्यामुळे छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नक्की कुणाचा अर्ज अधिकृत ठरतो हे पाहाणे महत्त्वाचे आहे.

‘वेळ पडल्यास महापौरपद सोडेन’

ओमी कलानी यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या प्रचारात सहभागी होणार असे त्यांच्या पत्नी आणि भाजपकडून महापौर झालेल्या पंचम कलानी यांनी सांगितले. कलानी कुटुंब आधी मग इतर पक्ष. त्यामुळे वेळ पडल्यास महापौरपदाचा राजीनामा देऊ, असे पंचम कलानी यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उघड प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष व पक्षाचे उमेदवार कुमार आयलानी यांना याबाबत विचारले असता संबंधित नगरसेवक आणि महापौरांना नोटीस बजावणार आहोत. त्यानंतर गरज पडल्यास कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.