– धवल कुलकर्णी

शिवसेनेचा हिंदुत्ववाद हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत होऊ घातलेल्या संभाव्य आघाडी व सत्ता स्थापनेमध्ये जरी अडसर ठरत असला, तरीसुद्धा सेना हा आपला बाणा सत्तेसाठी गुंडाळून ठेवणार नाही, असे असे दिसते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन तीन आठवडे उलटले, तरीसुद्धा शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्यामुळे व सेनेच्या प्रयत्नांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही पुरेशी दाद न दिल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काहिशा भिन्न विचारांच्या व संस्कृतीच्या शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात त्या पक्षाचा हिंदुत्ववादी विचार हा अडचणीचा ठरत असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितले जाते. त्याच दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला प्रस्तावित अयोध्या दौरा रद्द केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याला कारण होतं या तीन पक्षांमध्ये चाललेल्या वाटाघाटीदरम्यान रामजन्मभूमी बाबरी मस्जिद जमिनीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच दिलेला निकाल. अर्थात, यापूर्वीसुद्धा या दोन्ही पक्षांनी शिवसेनेसोबत वेळोवेळी अनेक तडजोडी केल्या आहेत, हा भाग मात्र अलाहिदा…

परंतु, सत्तेसाठी शिवसेना आपला हिंदुत्ववादी विचार बासनात बांधून ठेवणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेसाठी ठरवण्यात येणारा किमान समान कार्यक्रम (common minimum programme) हा महाराष्ट्रापुरत्या विषयावर मर्यादित असेल, असे संकेत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिले.  ह्या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती, कृषिपंपांच्या थकित वीज बिलांवर तीस टक्क्यापर्यंत माफीचा अंतर्भाव असणारी अभय योजना, अर्थव्यवस्थेला चालना, रोजगार निर्मिती, या मुद्द्यांचा समावेश असू शकतो, असे ह्या शिवसेना नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हा कार्यक्रम तीनही पक्षांच्या जाहीरनाम्या मधल्या समान मुद्द्यावर बेतलेला असेल.  “या किमान समान कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राशी निगडित विषयांचा समावेश असेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देणे, किंवा हिंदुत्व, यावर शिवसेना व या दोन्ही पक्षांमध्ये मतभिन्नता जरी असली, तरीसुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नावर एक येत आहोत. शेवटी, हिंदुत्व हा शिवसेनेचा एक बाणा आहे. आम्ही तो गुंडाळून ठेवू शकत नाही,” असे हा नेता म्हणाला.

एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सत्तास्थापनेसाठी दिरंगाई जरी होत असली, तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या अटी मान्य केल्यास या दोन्ही पक्षांचे सरकार येऊ शकते, असा दावा या शिवसेना नेत्याने केला.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. शिवसेनेच्या वतीने भाजप विरुद्ध खिंड लढवणारे पक्षाचे राज्यसभेचे खासदार व सामना वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधला एक दुवा आहेत.

“सध्या शिवसेना व भारतीय जनता पक्षामधील संबंध हे कमालीचे ताणले गेले असले तरीसुद्धा हिंदुत्व हा आम्हाला बांधणारा समान धागा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा संघ परिवाराने पुढाकार घेतल्यास, दोन्ही पक्षांमध्ये ताणलेले, विकोपाला गेलेले संबंध हे सुधारू शकतात. दोन्ही पक्षांना मान्य होईल असा एक दोघांनाही सन्माननीय असा तोडगा निघू शकतो. यात एक पर्याय हा भाजपने पहिली अडीच वर्ष स्वतःचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात नेमावा, पुढच्या अधिक वर्षांचा कार्यकाळ हा शिवसेनेला द्यावा असा असू शकतो,” असे मत एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याने व्यक्त केले आहे. पण एक प्रश्न असा आहे की दोन्ही पक्ष ह्यासाठी एकेक पाऊल मागे जातील का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा, की भारतीय जनता पक्षाला पुन्हा आपला मुख्यमंत्री निवडण्याची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचाच पुन्हा नंबर लागेल का? ही शंका या ज्येष्ठ शिवसेना नेत्याने व्यक्त केली आहे.