भाजपा आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं असून रात्री ८.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे शिफारस पत्र पाठवलं आहे. मात्र राष्ट्रवादीला देण्यात आलेली मुदत संपण्याच्या आधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट शिफारसीचं पत्र पाठवल्याने शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करत विचारणा केली आहे की, “राष्ट्रवादीला देण्यात आलेली मुदत संपलेली नसतानाही राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस कशी करु शकतात?”.

राष्ट्रीय प्रवक्त्या असणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षावर असणाऱ्या नाराजीमळे त्यांनी राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्ष कार्यकर्त्यांकडून मिळणारी वाईट वागणूक तसंच स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांना पक्षात परत घेतल्याच्या कारणावरून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी राजीनाम्यात सांगितलं होतं.

महाराष्ट्रात सत्तस्थापनेचा अभूतपूर्व घोळ निर्माण झाला आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं. आता राष्ट्रवादी काँग्रेस जर रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झाला आहे त्याची चर्चा होऊ शकते. त्यामुळे दिल्लीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स समिटसाठी ब्राझिलला जाणार आहेत. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

२४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागला. निकालामध्ये महायुतीला कौल मिळाला. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं अशी आग्रही भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे आमचं ठरलंय वरुन आमचं बिनसलंयपर्यंत हे दोन पक्ष आले. त्यानंतर भाजपाने शिवसेना सोबत येत नसल्याने सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु केली. मात्र शिवसेनेला जी वेळ देण्यात आली होती त्या वेळेत शिवसेनेलाही दावा सिद्ध करता आला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. यासंदर्भातली शिफारस करण्यात आलेली आहे.