|| अविनाश कवठेकर

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघात भाजपविरोधात काँग्रेस, मनसेचे उमेदवार रिंगणात असून शिवसेनेच्या उमेदवाराने बंडखोरी केल्यामुळे येथे चौरंगी लढत होत आहे. लढत चौरंगी असली, तरी भाजप-काँग्रेसमध्येच सरळ लढत होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना बंडखोरांना किती मतदान होणार, याबाबत उत्सुकता आहे. भाजपचे या मतदार संघावरील वर्चस्व लक्षात घेता येथील लढत एकतर्फीच होण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाकडून महापौर मुक्ता टिळक, काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विशाल धनवडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कसबा विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची संख्या २० आहे. त्यामध्ये १६ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. तर शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक आहेत. यापूर्वी कसबा मतदार संघातून विद्यमान खासदार गिरीश बापट हे सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांचे जाळे, संघटनात्मक ताकद वेळोवेळी दिसून आली आहे. बापट खासदार झाले असले तरी त्यांची मतदार संघावर असलेली पकड, अन्य पक्षांशी, संस्थांशी त्यांचे असलेले घनिष्ट संबंध यामुळे भाजपच्या मुक्ता टिळक यांना निवडून आणण्याची जबाबदारी एकप्रकारे त्यांच्यावरच आहे. मुक्ता टिळक यांच्या प्रचारानिमित्ताने कसबा मतदार संघातील पदाधिकारीही सरसावले आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये या मतदार संघातून काँग्रेसने सातत्याने निवडणूक लढविली आहे. सन २०१४ मध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वतंत्रपणे लढले. मात्र त्यामध्ये भाजप उमदेवारालाच मतदारांनी पसंती दर्शविली. यापूर्वी काँग्रेसकडून सातत्याने या मतदार संघात उमेदवार देण्यात आला आहे. काँग्रेसला मानणारा वर्ग मतदार संघात असला, तरी काँग्रेसची संघटनात्मक ताकद मतदार संघात राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच अंतर्गत वाद-विवादामुळे काँग्रेस एकसंध राहिलेली नाही. या परिस्थितीत भाजप उमेदवाराला लढत देण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे.

या मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा वर्ग काही प्रमाणात असल्याचा दावा करण्यात येत आहे. सन २००९ मध्ये बापट यांना मनसेच्या उमेदवाराने कडवी लढत दिली होती. बापट यांचा तेव्हा विजय झाला, तरी त्यांना संघर्ष करावा लागला होता, याकडे मनसेकडून लक्ष वेधले जात आहे. मात्र सध्या मनसेची ताकद कमी झाली आहे. तेव्हा लढत दिलेले उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उमेदवारीवरून मनसेमध्येही अंतर्गत धुसफूस आहे. एकूण कसब्यातील लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये होईल, अशी शक्यता आहे.

शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक विशाल धनवडे यांनी मुक्ता टिळक यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. अन्य बंडखोरांनी अर्ज मागे घेतलेले असतानाही धनवडे यांनी अर्ज कायम ठेवून प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेकडून त्यांना समज देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना भाजपबरोबर असल्यामुळे शिवसेनेकडूनही त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळण्याची शक्यता कमीच आहे.