|| मंदार लोहोकरे

पंढरपूर, माढा, माळशिरस आणि सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे प्रत्येकी दोन दोन उमेदवार विजयी झाले. यात पंढरपूर येथून राष्ट्रवादीचे भारत भालके यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. तर माढय़ातून राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे यांनी विजयाची डबल हॅट्ट्रिक साधत विक्रमी मतांनी विजयी झाले. तर सांगोल्यात शेकापचा गड ढासळला. इथे शिवसेनेचे शहाजी पाटील अवघे ७६८ मतांनी विजयी झाले. तर दुसरीकडे माळशिरसमध्ये ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाला. इथे भाजपाचे राम सातपुते विजयी होऊन कमळ फुलले. माढा वगळता अन्य तीन ठिकाणी अत्यंत चुरशीची लढती झाल्या

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत याही वेळेस भारत भालके विजयी झाले. भालकेंनी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात भाजपाचे सुधाकरपंत परिचारक,काँग्रेसचे शिवाजी काळुंगे आणि अपक्ष समाधान अवताडे रिंगणात होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भालके यांनी आघाडी घेतली. ती आघाडी त्याना विजयाकडे घेऊन गेली. पंढरपूर शहर आणि तालुक्यासह मंगळवेढा येथून भालके यांना चांगली मते मिळाली. परिचारक काही ठिकाणी भालके यांची आघाडी कमी करण्यात यशस्वी झाले. मात्र पुढच्या फेरीत ते पुन्हा मागे राहिले. अखेरीस भालके याना ८९,७८७, परिचारक यांना ७६,४२६,  अवताडे यांना  ५४,१२४ तर काळुंगे याना ७२३२ एवढी मते मिळाली. राष्ट्रवादीचे भारत भालके १३,३६१ मतांनी विजयी झाले.

माढा विधानसभेची निवडणूक दुरंगी झाली. मात्र यात अपेक्षितप्रमाणे राष्ट्रवादीचे बबन शिंदे सलग सहा वेळा विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत शिंदे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक नव्हते. त्यांनी भाजपत प्रवेशासाठी प्रयत्न केले. मात्र तिथे प्रवेश न झाल्याने राष्ट्रवादीतर्फे उभे राहिले. हा मतदारसंघ सेनेच्या वाटय़ाला आला. येथील सेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी उद्योजक संजय कोकाटे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शिंदे यांनी आघाडी घेतली. माळशिरसमधील १४, पंढरपूर तालुक्यातील ४२ आणि माढा तालुक्यातील ८२ गावांत शिंदे यांना आघाडी मिलाली. अखेरीस राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांना १,४२,५७३ तर सेनेचे संजय कोकाटे यांना ७४,३२८ मते मिळाली. यात शिंदे यांनी ६७ हजारहून अधिक मतांनी विजय साजरा करताना डबल हॅट्ट्रिक साधली. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापच्या गडाला खिंडार पाडण्यात सेनेला यश आले. या मतदारसंघातून गेली ११ वेळा विजयी झालेले गणपतराव देशमुख यांचा हा मतदारसंघ शेकापचा गड म्हणून ओळख होती. यंदा गणपतराव यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना निवडणुकीत उतरविले. गणपतराव यांनी ही निवडणूक भावनिक करून मतदारांपुढे गेले. जातीचे राजकारण खूप चालले. मात्र शेकापने घराणेशाही लादली असा आरोप करीत सेनेचे शहाजी पाटील यांनी प्रचाराची सुरुवात केली. त्यात शेकापने जाहीर केलेले भाऊसाहेब रुपनर आणि राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे नाराज होऊन सेनेत दाखल झाले. त्यामुळे सेनेची ताकद वाढली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून डॉ. अनिकेत आघाडीवर होते. त्यानंतर पाटील तर कधी अनिकेत अशी सापशिडी सुरु झाली. पोस्टल मते मोजली यात सेनेचे शहाजी पाटील ७६८ मतांनी विजय झाले. मत्र शेकापने फेरमतमोजणीची मागणी केली. अखेर पाटील विजयी घोषित करून शेकापच्या गडाला सेनेने खिंडार पाडण्यात यशस्वी झाले. माळशिरस विधानसभा निवडणुकीत ऊस तोड कामगाराचा मुलगा आमदार झाला. इथे भाजपाचे पूर्वाश्रमीचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात सरळ लढत झाली. या मतदारसंघात मोहिते पाटील यांचे वर्चस्व आहे. तर मोहिते पाटील यांचे विरोधक मानले जाणारे जानकर यांना ही निवडणूक सोपी नव्हती. मतमोजणीच्या सुरुवातीला जानकरांनी आघाडी घेतली. ती पुढे कायम राहिली. मात्र अकलूज,नातेपुते या भागात सातपुते पुढे गेले आणि विजयी झाले. यात उत्तम जानकर यांना १ लाख ९१७ तर राम सातपुते याना १ लाख ३ हजार ५०७ मते मिळाली. सातपुते २५९० मताधिक्यांनी विजयी झाले. माळशिरस मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी मोहिते पाटील यांच्या खांद्यावर होती. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली असे असले तरी या निवडणुकीत ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाला आहे.