ठाणे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा बनलेले कळवा-मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी (३ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरला. आव्हाड यांनी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये कफ परेड येथील वादग्रस्त आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट असल्याचे नमूद केले आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या आदर्श सोसायटी घोटाळ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाने फ्लॅट दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर अनेक नेत्यांची सीबीआय चौकशीही झाली होती, त्यावेळी आव्हाडांनी मला मुंबईत घर हवं होतं, म्हणून फ्लॅट घेतल्याचे सांगितले होते. लष्करातील जवानांच्या विधवा पत्नींसाठी या सोसायटीत फ्लॅट राखीव असताना ते राजकीय नेत्यांनी ल त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे आरोप झाले होते. याच प्रकरणात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. आता आव्हाड यांच्या प्रतिज्ञापत्राच्या निमित्तानं आदर्शचं नाव पुन्हा समोर आलं आहे.

आव्हाड यांनी प्रतिज्ञापत्रात मुंबईमधील कफ परेड येथील आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावरील ६०१ क्रमांकाचा फ्लॅट आपल्याला मिळाल्याचे म्हटले आहे. या फ्लॅटचे हस्तांतरण पत्रही मिळाले असून ही मालमत्ता विवादित असल्याचेही आव्हाड यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ ६३६ चौरस फूट असून वापरता येणाऱ्या जागेचे क्षेत्रफळ ५२१ चौरस फूट असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. १० ऑगस्ट २००४ रोजी या मालमत्तेचे हस्तांतरण पत्र मिळाले असून खरेदीच्या वेळी या फ्लॅटची किंमत एक कोटी पाच लाख रुपये इतकी होती असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय आव्हाड यांनी स्थावर मालमत्तेमध्ये आपल्या नावावर ठाण्यातील येऊर, नाशिकमधील सिन्नर येथे शेतजमीन असल्याचे म्हटले आहे. तर बिगर शेती मालमत्तेमध्ये येऊरमध्ये बंगला, मुलुंडमध्ये गाळा असल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

आव्हाड यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या संपत्तीसंदर्भात माहिती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रात आव्हाड यांनी त्यांच्या आणि त्यांची पत्नी ऋता यांच्या नावे किती संपत्ती आहे याची माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार आव्हाड यांची एकूण जंगम मालमत्ता १३ कोटी ६७ लाख ९१ हजार रुपयांहून अधिक आहे. तर स्थावर मालमत्ता २७ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांहून अधिक आहे. म्हणजेच आव्हाड हे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (स्थावर व जंगम मालमत्ता मिळून १६ कोटी रुपये) यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत. आव्हाड यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये २५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम गुंतवली असल्याचे म्हटले आहे. यापैकी काही बँकांमध्ये वैयक्तिक गुंतवणूक आहे तर काही ठिकाणी भागीदारीमध्ये अथवा कंपन्यांच्या नावे गुंतवणूक करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शेअर्स आणि एलआयसी पॉलिसीही आपल्या नावे असल्याचे आव्हाड यांनी नमूद केले आहे. याशिवाय त्यांनी १० लाख ३४ हजारांची होंडा सीटी आणि ४५ लाख ३१ हजारांची बीएमडब्यू गाडीही आपल्या मालकिची असल्याचे म्हटले आहे.