महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. प्रचारासाठी उरलेले काही तास लक्षात घेता सर्व उमेदवार मतदारसंघातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंब्रा-कळवा भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या जागेकडेही सर्वांचं लक्ष आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचं आव्हान असणार आहे.

मुंब्रा-कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. यंदा युवा कम्युनिस्ट नेता कन्हैया कुमारनेही आव्हांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. मुंब्रा येखील एका महाविद्यालयात उपस्थित विद्यार्थ्यांशी यावेळी आव्हाड आणि कन्हैया कुमार यांनी संवाद साधला. भाजपा सरकारवर टीका करताना कन्हैया कुमारने जितेंद्र आव्हाडांना मतदान करण्याचं आव्हान केलं. यावेळी आपलं छोटेखानी भाषण संपताना कन्हैया कुमारने हमें चाहीए आझादी हे गाणं म्हटलं, ज्याला जितेंद्र आव्हाडांनीही साथ दिली.

युतीच्या जागावाटपात मुंब्रा-कळवा हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना मैदानात उतरवलं. सय्यद यांनी याआधीही ‘आप’च्या तिकीटावर निवडणूक लढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दिपाली सय्यद जितेंद्र आव्हाडांना कितपत आव्हान देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.