१० वी, १२ वीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका

निवडणुकांच्या कामामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबण्याची भीती होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी अ ना वळवी यांनी याचे आदेश दिले आहेत.

दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना निवडणुकांचे काम देऊ नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणुकांच्या कामातून वगळले जावे अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. निवडणुकांच्या कामामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबण्याची भीती होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

यासाठी शिक्षक संघटनांनी प्रयत्न केले होते. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने याप्रकरणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, शिक्षण सचिव व बोर्डाला पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५ जून पूर्वी बोर्डाचे निकाल लावण्यासाठी दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी केली होती.

बोर्डानेही सकारात्मक प्रतिसाद देऊन शिक्षण सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत विनंती केली होती. शिक्षक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे निवडणूक आयोगाने हा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पूर्वीही २०१४ च्या लोकसभा व २०१७ च्या महानगर पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवेळी अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 10th 12th teachers get relief from election work order by election commission