महाराष्ट्रात आज १३६२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे करोना रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या १८ हजार १२० झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात महाराष्ट्रात आज कालपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या १८ हजार १२० झाली आहे. फेसबुक लाइव्हद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.

१०० लोक जर वाढले तर २५ लोकांना डिस्चार्ज दिला जातोय. लक्षणं नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे साधारण ७३ टक्के असतात अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली. अमेरिकेत १० लाख लोकांमध्ये ४ हजार लोक हे करोना पॉझिटिव्ह आढळतात. त्याचप्रमाणे इटलीतही अशाच प्रकारे रुग्ण आढळतात. यु. के. मध्ये हे १० लाख लोकांमध्ये २७०० रुग्ण आढळतात. तर भारतात हे प्रमाण १० लाखांमध्ये ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळतात.

या देशांमध्ये मृत्यूचं प्रमाण जर पाहिलं तर १० लाख लोकांमध्ये ४००, ३०० असं आहे. मात्र भारतात १० लाख लोकांमध्ये १ मृत्यू करोनामुळे होतो असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सर्वसाधारण परिस्थिती पाहिली, तर आजही करोनाचा प्रादुर्भाव हा नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात करोनाच्या केसेस वाढत आहेत, मात्र काळजीचं कारण नाही. आपल्याला अधिक सतर्क रहावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात आपण २ लाखापर्यंत चाचण्या केल्या आहेत. तसंच चाचणी करण्याची केंद्रही वाढवली आहेत. सुरुवातीला १ केंद्र होतं ही संख्या आता ६१ वर गेली आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला.

धारावीत ५० रुग्ण वाढले

मुंबईतल्या धारावीत आज नवे ५० रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे धारावीतली रुग्णसंख्या ७८३ झाली आहे. आज धारावीत एक मृत्यू झाला आहे. धारावीत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन २१ जणांचा मृत्यू झाला आहे.