महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही ८९ झाली आहे. तर फिलीपीन्समधून मुंबईत आलेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या नागरिकाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. सुरुवातीला या नागरिकाची करोना चाचणी सकारात्मक आली होती. मात्र नंतर त्या नागरिकाला करोनाची लागण झाली नाही असं समजलं. मूत्रपिंडाचा त्रास आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सगळ्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. अशात महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या ७४ होती. मात्र १५ रुग्ण वाढल्याने ही संख्या ८९ वर पोहचली आहे.

रुग्णसंख्या वाढली आहे मात्र लोकांनी काळजी करु नये. शक्यतो घरी रहावं, घराबाहेर पडू नये. स्वयंशिस्त पाळावी अशी विनंती आणि आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. रविवारचा पूर्ण दिवस भारताने जनता कर्फ्यूचं पालन केलं. मात्र लोकल ट्रेन बंद असल्याने सोमवारच्या दिवशी खासगी वाहनांनी मुंबईत जाण्यासाठी गर्दी होते आहे. ही गर्दी करणं चुकीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लोकांनी ३१ मार्च पर्यंत संयम पाळावा. आज जे अनावश्यक कारणाने मुंबईत जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असाही इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. सध्याच्या घडीला एका करोनाग्रस्ताची स्थिती थोडी गंभीर आहे अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली. मात्र कुणीही घाबरुन जाण्याचं कारण नाही. लॉकडाऊनला प्रतिसाद द्या, घरातून बाहेर पडू नका, करोनाचा फैलाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळा असंही त्यांनी म्हटलं आहे.