महाराष्ट्रात करोनाचे १६०२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या २७ हजार ५२४ इतकी झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात ४४ जणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. आज ५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६ हजार ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज झालेल्या ४४ मृत्यूंपैकी २५ मृत्यू मुंबईत, १० मृत्यू नवी मुंबईत, ५ मृत्यू पुण्यात, २ मृत्यू औरंगाबादमध्ये, १ मृत्यू पनवेलमध्ये आणि १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत झाला आहे. नवी मुंबईत १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीत १० मृत्यू झाले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या यादीत करण्यात आला आहे.

४४ मृत्यूंपैकी ३१ पुरुष आणि १३ महिला होत्या. यापैकी २१ जणांचं वय हे ६० वर्षे वयाच्या वरचे होते. २० जणांचं वय ४० ते ५९ या वयोगटातलं होतं. तर तिघांचं वय ४० वर्षे वयाच्या खालील होते. ज्या ४४ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी ३४ जणांना मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब असे गंभीर आजार होते.