सोलापूर जिल्ह्य़ात यंदा जनावरांसाठी ३१५ चारा छावण्या सुरू असून, त्यात लहान-मोठी मिळून दोन लाख ५४ हजार जनावरे दाखल आहेत. त्यावर आतापर्यंत २२८ कोटी इतका खर्च झाला आहे. यापूर्वी चारा डेपो सुरू केले असता त्यावर शंभर कोटी खर्च झाले होते. हा खर्च धरून जिल्ह्य़ात चाऱ्यावर झालेल्या खर्चाचा आकडा ३२८ कोटींच्या घरात गेला आहे.
चारा छावण्यांमध्ये दाखल असलेली मोठी जनावरे दोन लाख २० हजार ९१८ एवढी आहेत, तर लहान जनावरांची संख्या ३३ हजार ७०९ इतकी आहे. चारा छावण्यांवर झालेला खर्च २२८  कोटी असून त्यापैकी १६५ कोटी ६२ लाखांची रक्कम चारा छावणीचालकांना अदा करण्यात आली आहे.
तथापि, चारा छावण्यांमध्ये गैरप्रकार आढळून आल्याने संबंधित चारा छावणीचालकांना जिल्हा प्रशासनाने तीन कोटींचा दंड सुनावला आहे. संबंधित चारा छावणीचालकांनी जिल्हा प्रशासनाविरोधात तक्रारींचा पाढा वाचत आक्रमक पवित्रा घेवून छावण्या बंद ठेवण्याचा इशारा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली.
मात्र पावसाळ्यात छावणीचालकांवर सदर कारवाई होण्याची शक्यता प्रशासनाच्या वर्तुळात व्यक्त होत आहे.

सांगोल्यात सर्वाधिक छावण्या
सद्यस्थितीत जिल्ह्य़ात सर्वाधिक ९५ चारा छावण्या सांगोला तालुक्यात असून, तेथील दाखल जनावरांची संख्या एक लाख ४०६६ एवढी आहे. मंगळवेढा तालुक्यात ७७ चारा छावण्या असून, त्यात दाखल असलेली जनावरे ४४ हजार ७६७ इतकी आहेत. माढा तालुक्यात ४१ चारा छावण्यांमध्ये २५ हजार ९८२ जनावरे चाऱ्याचा लाभ घेत आहेत.