रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आश्रमातील मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच नाशिक शहरात अनाथ आश्रमातील तीसहून अधिक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले गेल्याचे उघड झाले आहे. जय आनंद निराश्रित (अनाथ) बालगृहात घडलेला हा विकृत प्रकार उघड झाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर एकूण पाच कर्मचाऱ्यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
पेठरोडवरील तवली फाटा येथील जय आनंद निराश्रित (अनाथ) बालगृहात मागील सहा ते आठ वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. बालगृहात ५९ मुले तर ३४ मुली वास्तव्यास होत्या. कर्मचाऱ्यांकडून मुलींसमोर अश्लील चाळे करणे, मुली स्नान करत असताना आत डोकावणे हे प्रकार सातत्याने सुरू होते. महिला बालकल्याण समितीचे सदस्य गेल्या रविवारी बालगृहात तपासणीसाठी गेले असताना काही मुलींनी महिला सदस्यांना हा सर्व प्रकाराची माहिती दिली.
या घटनेची गंभीर दखल घेत समितीने सर्व मुलींना नासर्डी पुलानजीक असलेल्या महिला बालविकास कल्याण विभागाच्या अभिरक्षणगृहात हलविले. मुलींनी तक्रार केल्यानंतर बालगृहातील भाऊसाहेब थोरात, संतोष थोरात, हरेश पाटील, राजेंद्र निकम आणि जगन्नाथ भालेराव या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
तसेच या प्रकरणी महिला बाल कल्याण विभागाने पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून भाऊसाहेब थोरात, संतोष थोरात, हरेश पाटील व जगन्नाथ भालेराव या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.