राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसांना देखील करोनाचा संसर्ग अधिकच होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चोवीस तासांत राज्यात आणखी ६७ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सद्यस्थितीस १ हजार ९७ पोलिसांवर करोनाचा उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ५९ वर पोहचली आहे.

तसेच, मागील चोवीस तासांत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आणखी ५३ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. तर चार जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यां जवानांची एकूण संख्या ३५४ झाली आहे व आतापर्यंत ६५९ जणांनी करोनावर मात केली असल्याची माहिती, बीएसएफकडून देण्यात आली आहे.

देशभरात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्याही वाढताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात ३ लाख ३४ हजार ८२२ जणांनी करोनावर मात केली आहे. २९ जूनपर्यंत देशभरात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख १० हजार २९२ नमूने काल तपासले गेले आहेत.

देशभरात चोवीस तासांत करोनामुळे ४१८ जणांचा मृत्यू झाला असून, १८ हजार ५२२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे. सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे देशभरात एकूण १६ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.