नागपूरच्या चार शाळांचा समावेश

केंद्र शासनाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत’ नीती आयोगाच्या माध्यमातून राज्यातील ७३ शाळांची निवड करण्यात आली असून त्यात नागपूर जिल्ह्य़ातील चार शाळांचा समावेश आहे.

नॅशनल इन्स्टिटय़ूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिग इंडियाने (नीती) तरुणाईला विज्ञान विषयाची गोडी लागावी, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि कल्पकता रुजवली जावी म्हणून ही योजना सुरू केली असून त्यात राज्यातील अनेक शाळांना लाखांच्या घरात अनुदान देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट होती. प्रथम फेरीत १४ हजार शाळांनी यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी ९८४ शाळांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील ७३ शाळांचा त्यात समावेश आहे. पहिल्या यादीत ३५ शाळांचा समावेश करण्यात आला होता.

अहमदनगरची ध्रुव अकादमी, अकोला जिल्ह्य़ातील पातूरची शहाबाबू उर्दू हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, औरंगाबादेतील गोदावरी पब्लिक स्कूल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, श्री सरस्वती भूवन हायस्कूल, बीडची डॉ. पारनेरकर महाराज माध्यमिक आणि बुलढाणा जिल्ह्य़ातील मलकापूरची उच्च माध्यमिक शाळा, लीलाधर भोजराज चांडक विद्यालय तसेच एमएसएम इंग्लिश स्कुल, गडचिरोलीतील कुंठे पाटील इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, जालन्यातील संस्कार प्रबोधिनी स्कूल, लातूरची छत्रपती शाहू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, मुंबई शहरातील लीलावतीबाई पोद्दार हायस्कूल आणि केंद्रीय विद्यालय नंबर १ कुलाबा, मुंबई सुंदरबनातील चत्रभूज नरसी मेमोरिअल स्कूल, राजहंस विद्यालय, केंद्रीय विद्यालय आयआयटी पवई मुंबई, नांदेडच्या देगलुर येथील मानव्य विकास विद्यालय, नाशिक येथील यशोदामाता दयाबाई बिटको गर्ल्स हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज व मराठा हायस्कूल एमव्हीपी कॅम्पस शिवाजीनगर आणि गुरू गोविंद सिंग पब्लिक स्कूल या तीन शाळांना अटल टिंकरिंग लॅबची सुविधा प्राप्त होणार आहे.

याशिवाय उस्मानाबादेतील मुरुमची प्रतिभा निकेतन विद्यालय, परभणीची शांताबाई नखाते सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी स्कूल, पुण्याची केंद्रीय विद्यालय आर्मी क्षेत्र, सांगलीतील वात्सल्यादेवी देसाई हायस्कूल आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालय, सिंधुदुर्गची मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्या मंदिर, सोलापुरातील गोपालराव देव प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज तसेच बेगम कमरुनिसा कारिगर गर्ल्स हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, ठाण्यातील अग्रसेन हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, वध्र्यातील भारत उच्च माध्यमिक विद्यालय आणि यवतमाळातील यवतमाळ पब्लिक स्कूल यांना अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत अनुदान मिळणार आहे.

साचेबद्ध विचाराला कलाटणी देऊन विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनिर्मिती करावी, यासाठी कटिबद्ध असलेली १३२ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली न्यू इंग्लिश हायस्कू ल ही नागपूर नगरीतील प्रथम शाळा होय. सर्व क्षेत्रात स्वयंपूर्णतेचा ध्यास घेऊन ही शाळा स्वत:ची आधुनिक प्रतिमा समाजापुढे साकारण्यात यशस्वी ठरली आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रयोग करून पाहतील आणि विचारप्रवण होतील, असा विश्वास शाळेच्या (माजी) मुख्याध्यापक आरती खांडेकर यांनी व्यक्त केला आहे.

नागपूरच्या शाळा

नागपुरातील काँग्रेसनगरची न्यू इंग्लिश हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, केंद्रीय विद्यालय वायूसेनानगर, बाबा नानक सिंधी हिंदी हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज आणि मोहनलाल रुगवानी सिंधी हिंदी हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज अशा चार शाळांची अटल टिंकरिंक लॅबसाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय दुसऱ्या यादीत १४ आणि तिसऱ्या यादीत २४ लॅब महाराष्ट्राला मिळाल्या आहेत.

एकूण २० लाख रुपये प्रत्येक शाळेला मिळतील. पहिल्यांदा १० लाख रुपये आणि त्यानंतर दरवर्षी दोन लाख रुपये देखभालीसाठी शासन देणार आहे. शाळेचे नॅक वगैरे सर्वच झाले आहे. काँग्रेसनगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अमेय एदलाबादकर आणि नितीन चौबे हे दोन शिक्षक लॅबचे काम पाहणार आहेत.

– स्नेहल पिंपळखुटे, शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, काँग्रेसनगर