अतिरिक्त सज्जांच्या कार्यभारामुळे कर्मचाऱ्यांवर ताण

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : जिल्ह्य़ातील १८४ तलाठी पदांपैकी ७३ पदे रिक्त असल्याने अनेक तलाठय़ांना तीन ते चार अतिरिक्त सज्जांचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. तलाठी संवर्गाच्या भरतीविरोधात न्यायालयात याचिका दाखल असून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची पालघर जिल्हा शाखा या याचिकेत प्रतिवादी म्हणून दाखल होण्याच्या तयारी करीत आहे.

राज्य शासनाने १ ऑगस्ट २०१४ रोजी राज्यातील ३६ वा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती केली. या जिल्ह्य़ात एकूण जुने १८३ सजे व पुनर्वसन विभागातील एक अशी १८४ पदे आहेत. जिल्हानिर्मिती झाल्यानंतर २०१५ मध्ये तलाठी भरतीसंदर्भात जाहिरात काढून रिक्त असलेल्या २९ पदांपैकी पंचवीस पदांपर्यंत करिता परीक्षा घेण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आला होता.

राज्यपालांनी पेसा अधिसूचनेनुसार तलाठी, ग्रामसेवक इत्यादी संवर्गातील आदिवासी उमेदवारांसाठी पदे राखीव ठेवली होती. त्यानुसार तलाठी १२ पदे स्थानिक आदिवासी उमेदवारांकडून भरणे निश्चित करण्याबाबत १५ फेब्रुवारी २०१५ रोजी शासन निर्णय झाला होता. या अधिसूचनेच्या विरोधात बिगरआदिवासी हक्क बचाव समिती यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून भरती प्रक्रियेला ३० सप्टेंबर २०१५ रोजी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर २०१५ पासून आजवर जिल्ह्य़ातील तलाठी भरती झालेली नाही.

पालघर जिल्ह्य़ात सध्या ७३ रिक्त पदे असून अनेक तलाठय़ांकडे अतिरिक्त तीन ते चार सज्जांचा कार्यभार आहे. त्यामुळे मूळच्या सजांचे महसुली काम करून अतिरिक्त सजाच्या कामाला योग्य न्याय देता येत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे तलाठी संवर्गाविरोधात अनेक तक्रारी वरिष्ठांकडे येत असून तलाठी सतत दबावाखाली काम करत असल्याचे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिले आहे.

बिगरआदिवासी संघटनांनी भरती प्रक्रियेला स्थगिती आदेश आणला असताना ग्रामसेवक आणि कृषी साहाय्यक या पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यरत झालेले आहेत. तसेच राज्यात नंदुरबार, धुळे आणि गडचिरोली या आदिवासी जिल्ह्य़ांत तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याकडे लक्ष वेधले आहे. पदे रिक्त राहिल्याने निवडणूक कामे, महसूल वसुली, संगणकीकरण कामांवर परिणाम झाला आहे.

१५८ तलाठी पदे रिक्त?

पालघर जिल्ह्य़ातील १८४ तलाठी पदांपैकी ७३ पदे रिक्त असून त्यापैकी पालघर तालुक्यात १९, डहाणू तालुक्यात १६, जव्हार आणि वाडा तालुक्यात प्रत्येकी नऊ, विक्रमगड तालुक्यात सात, वसई, तलासरी व मोखाडा तालुक्यात प्रत्येकी चार पदांचा समावेश आहे. याखेरीज नव्याने मंजूर झालेल्या सुधारणांचा विचार केल्यास जिल्ह्य़ात एकूण १५८ तलाठी पदे रिक्त असल्याची माहिती पुढे येत आहे.