अशोक तुपे, लोकसत्ता

श्रीरामपूर : आहारतज्ज्ञांना तांदळाचे मोठे वावडे आहे. कारण त्यामुळे स्थूलपणा वाढतो. पण शाकाहारी असो की मांसाहारी सर्वानाच थाळीत डाळभात हवा. त्याखेरीज जिव्हा तृप्त होत नाही. आता हाच तांदूळ ‘अ’जीवनसत्त्वाने युक्त असणार आहे. ‘ग्रीनपीस’सह अनेक संघटनांनी विरोध केल्यानंतरही अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने ‘गोल्डन राईस’ या सोनेरी रंगाच्या तांदळाला तो अपायकारक नाही तर गुणकारक आहे, असे प्रशस्तिपत्र दिले आहे. फिलीपाईन्स सरकारने गोल्डन राईसच्या लागवडीला यंदा परवानगी दिली आहे, असे असले तरी जनुकबदल तंत्रज्ञानाच्या पिकांच्या चाचण्या व लागवडीला भारतात बंदी आहे. त्यामुळे हा तांदूळ लगेच अधिकृतपणे भारतात येणार नाही पण इतर मार्गाने तो येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Kia Sonet car Sale
बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या; कियाच्या ‘या’ ५ सीटर SUV कारची ४ लाखाहून अधिक युनिट्सची विक्री, किंमत…
joi biden
अन्वयार्थ: बायडेन प्रशासनाचा नैतिक विजय..
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (ईरी) व तांदूळ संशोधन संस्था फिलीपाईन्स यांनी बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आर्थिक मदतीतून ‘अ’जीवनसत्त्वयुक्त तांदळाचे संशोधन १९९३ पासून हाती घेतले होते. अविकसित व विकसनशील देशात लहान मुलांना रातांधळेपणा येतो. गोवरसारख्या आजाराला ही मुले बळी पडतात. ‘अ’जीवनसत्त्वाच्या अभावी अनेक मुलांचा मृत्यू  होतो. त्यामुळे त्यांना ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात मिळवून देणारा तांदूळ जनुक अभियांत्रिकीच्या  सहाय्याने विकसित करण्याचे संशोधन हाती घेण्यात आले होते. जनुक अभियांत्रिकी पद्धतीने बनविलेला हा तांदूळ सोनेरी रंगाचा असल्याने त्याला ‘गोल्डन राईस’ असे नाव देण्यात आले. या तांदळाला ग्रीनपीस तसेच पर्यावरणवादी अनेक संघटनांनी विरोध दर्शविला. ईरी संस्थेत लावण्यात आलेल्या तांदळाची रोपे उपटून टाकण्यात आली. तरीदेखील संस्थेने संशोधन सुरुच ठेवण्यात आले.

गोल्डन राईस हा ओरायझा सटायव्हा या उपगटातील वाण आहे. तो जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने १९९९ मध्ये तयार करण्यात आला. त्यात दोन जनुकांचा समावेश केल्याने बिटाकॅरोटीन तयार होते. ते ‘अ’ जीवनसत्त्वाची निर्मिती करते. अशाप्रकारे जनुक अभियांत्रिकीचा वापर करून ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त  गोल्डन राईस हा तांदूळ तयार करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने या तांदळाची तपासणी करुन त्यास मान्यता दिली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिलीपाईन्स या देशातील अन्न व औषध प्रशासनाने त्याची तपासणी केली. हा तांदूळ आरोग्याला हानिकारक नाही. तर पोषक आहे, असा निष्कर्ष या संस्थांनी काढला. त्यानंतर फिलीपाईन्स सरकारने या तांदळाच्या लागवडीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश व चीनमध्येही गोल्डन राईसला परवानगी दिली जाणार आहे.

रातांधळेपणावर उपाय

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २६ देशातील सुमारे चाळीस कोटी लोकांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता आहे. त्यामुळे दरवर्षी पाच लाख मुलांना रातांधळेपणाचा आजार होतो. तर दहा लाख मुले मरण पावतात. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियम योग्यप्रमाणात रहात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. एरवी हे  जीवनसत्त्व दूध व मांसाहारातून मिळते. आता ते गोल्डन  राईसमधूनही उपलब्ध होणार आहे.

गोल्डन राईसच्या निर्मितीत डॉ. पिटर बेएर, डॉ. पेट्रीक मुर, डॉ. अजेय कोहली यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (ईरी) या संस्थेच्या निर्मितीत अनेक देशांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे भारतही त्याचा सदस्य आहे. या संस्थेचे प्रमुख म्हणून डॉ. स्वामीनाथन यांनी काम पाहिले आहे.

गोल्डन राईसला देशात परवानगी नाही

फिलिपाईन्स सरकारने गोल्डन राईसच्या लागवडीला परवानगी दिली आहे. पण भारतात जनुकबदल पिकांच्या चाचण्या व लागवडीला परवानगी नाही. त्यामुळे या तांदळाची देशात लागवड करता येणार नाही. सध्या अशाप्रकारचे संशोधनही करता येत नाही. सरकारने परवानगी दिल्यानंतर असे वाण विकसित करता येऊ  शकतात.

डॉ. नरेंद्र काशिद, तांदूळ संशोधक, तांदूळ संशोधन केंद्र  वडगाव मावळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

लागवडीला परवानगी द्या

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा हक्क नाकारता कामा नये. गोल्डन राईसची लागवड करण्याची परवानगी त्यामुळे दिली गेली पाहिजे. सरकारने तणरोधक कपाशीच्या वाणाला परवानगी नाकारली आहे. बंदी असूनही शेतकऱ्यांनी एचटीबीटी कपाशीची लागवड केली. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा रविवार दि.५ रोजी हिवरी (यवतमाळ) येथे सत्कार करण्यात येणार आहे. तंत्रज्ञान स्वातंत्र्य महोत्सव शेतकरी संघटनेने तो आयोजित केला आहे.

अजित नरदे, अध्यक्ष, तंत्रज्ञान आघाडी, शेतकरी संघटना