राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतत निवडून येणारी साताऱ्याची जागा महायुतीत भाजपाने राष्ट्रवादीकडून बळकावली आहे. भाजपाने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सध्या साताऱ्याच्या उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागला आहे. परंतु, या जागेवरून आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेही उतरणार आहेत. १९ एप्रिल रोजी ते उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

अभिजीत बिचुकले म्हणाले, “मी एकच गोष्ट सांगतो की मी १९ तारखेला अर्ज भरणारच. भाजपाकडून तिकीट मिळावं अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिलाय याचं आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे. त्यानंतर लोकांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शक्तिप्रदर्शन काय असतं? शक्ती लोकांनी युद्धात दाखवली पाहिजे. मटण देऊन शक्ती दाखवली जात नाही.

“शरद पवार आणि उदयनराजेंचं हाडवैर आहे. मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतोय त्यामुळे यावेळी मला संधी द्या”, असंही अभिजीत बिचुकले यावेळी म्हणाले.

हेही वाचा >> अभिजित बिचुकलेंची घोषणा! “संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणूक लढणार”

काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती उमेदवारी

“कुठला पक्ष, कुठले नेते, कोण कुणाचे कार्यकर्ते, सतरंज्या उचलणारे आहेत याचं मला काही घेणंदेणं नाही. २००४, २००९, २०१४, २०१९ या चार निवडणुका मी लढवल्या आहेत. माझं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याच्या जनतेने २००९ मध्ये मला १२ हजारांहून जास्त मतदान केलं होतं. आताही तसंच मतदान होईल असं मला वाटतं. छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्र घेऊन देशाला नवी दिशा आणि दशा द्यायची आहे. मी लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करतो आहे. माझ्या संपूर्ण फॅन्सनी आणि सातारकरांनी माझा विचार करावा. मी सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेलं आहे. मला आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या ” असं बिचुकले काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

मागच्या विधानसभा निवडणुकीतही अभिजीत बिचुकले यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. परंतु, तिथून त्यांचं डिपॉजिट जप्त झालं.