िहगोली-नांदेड रस्त्यावर डोंगरगाव पुलानजीक मोटार झाडावर आदळून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जखमी झाला. या वाहनातून पोलिसांनी १६ लाख ५० हजारांचा गांजा ताब्यात घेतला. या प्रकरणात आरोपीच्या भ्रमणध्वनीवर आलेल्या क्रमांकाच्या आधारे चौकशी केली जाणार असून आरोपीला दूरध्वनी दिल्लीवरून आल्याचे निष्पन्न झाल्याने िहगोली पोलिसांचे पथक तपासासाठी दिल्लीला रवाना झाले आहे.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरपासून काही अंतरावर डोंगरगाव पुलाजवळ गेल्या २ जुलस मोटार झाडावर आदळून घडलेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तर एकजण जखमी झाला. अपघातग्रस्त मोटारीतून आणलेला दीड क्विंटल गांजा हैदराबाद येथून इंदोरला नेला जात होता. गांजा प्रकरणात तपास सुरू केला असता तिन्ही आरोपींकडे सापडलेल्या भ्रमणध्वनीवरील कॉल डिटेल्स घेतले. त्यातील माहितीनुसार आलेले कॉल्स प्रामुख्याने दिल्लीहून केले गेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणातील दिल्ली कनेक्शनच्या संबंधाचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक पियुश जगताप यांचे पथक शनिवारी पहाटे दिल्लीला रवाना झाले. दिल्ली येथून आरोपींच्या मोबाईलवर सतत संपर्कात असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जाईल. या प्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलिसांना योग्य ती माहिती दिली जात नसल्याने ही व्यक्ती केवळ प्यादा आहे; या प्रकरणामागे गांजा व्यवसायातील बडी असामी असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. दिल्लीत पोलीस पथकाच्या हाती काय लागते, यावर बरेच काही अवलंबून आहे.
अपघातग्रस्त वाहनातील साहित्याची चोरी  
अपघातातील वाहनातून पोलिसांनी गांजा ताब्यात घेतला. मात्र, या वाहनात आरोपींसोबत पसे होते किंवा नाही? पोलिसांना सापडलेल्या पेटीत कपडे होते की पसे? यावर जोरदार चर्चा होत असून ‘त्या’ पेटीसह वाहनातील चोरीस गेलेल्या साहित्याची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. मोटारीच्या टायरसह काही पार्ट्स चोरटय़ांनी लांबविल्याचे सूत्रांकडून समजले. त्यामुळे पोलिसांसमोर त्या पेटीसह मोटारीतून चोरीस गेलेल्या साहित्याचा शोध लावण्याचे आव्हान आहे.