कौडण्यपूर वर्धा नदी पूलावर गुरुवारी संध्याकाळी मालवाहू गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. मालवाहू गाडीची दुचाकीला धडक बसल्यानंतर मुलगा व आई नदी पात्रात फेकले गेले. महिलेला वाचवण्यात यश आले आहे तर मुलगा बेपत्ता आहे. विभा दिवाकर राजूरकर (३०), निलेश डहाके (२३) विराज राजूरकर (४) अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विभा राजूरकर या आर्वी तालुक्यातील जळगाव येथे तेराव्याच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यांचा भाऊ निलेश रमेश राव डहाके हा बहिणीला सोडण्यासाठी चांदूर येथे चालला होता. दुचाकीवर चौघेजण बसले होते. विभा, निलेश यांच्यासह त्याचे दोन भाचे स्वराज दिवाकर राजूरकर (४) आणि विराज दिवाकर राजूरकर (४) सोबत होते.

आर्वी वरून कौडण्यपूरमार्गे चांदूर येथे जात असताना वर्धा नदीवर पूलावर समोरुन येणाऱ्या मालवाहू गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी कठड्याला आपटून खाली पडली. निलेश आणि विराज हे दोघे मामा-भाचे पूलावरच पडले तर विभा आणि आणि स्वराज हे दोघे मायलेक वर्धा नदीत फेकले गेले. पोलीस व नागरिकांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश आले असून चार वर्षीय मुलाचा अद्यापही शोध लागलेला नाही. या महिलेवर आणि दोघांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.