हिवरे बाजार हे गाव केवळ पाहण्यासारखे नाही तर तेथील प्रगतीमुळे ते अनुभवण्यासारखे आहे असे गौरवोद्गार ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या गावाला भेट दिल्यानंतर काढले. हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, निवासी संपादक मुकुंद संगोराम, आत्मा संस्थेचे उपसंचालक संभाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत चौदा विषयांवर चर्चा झाली. गावातील संपूर्ण जमीन मोजणे, गावातील रस्ता कामांचा आढावा घेणे, विविध योजनांतून चालू असलेल्या इमारतींची बांधकामे, पाण्याचा ताळेबंद, सप्तसूत्रीची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता, अवजड वाहतूक, यशवंत मंगल कार्यालयाचा वापर या विषयांवर चर्चा झाली.
ग्रामसभांमध्ये गावच्या विकासाबाबत कशा प्रकारे सकारात्मक चर्चा होते हे इथे आल्यानंतर असे समजते असे सांगून कुबेर म्हणाले, की गावातील प्रत्येक माणूस गावच्या विकासाबाबत जागरूक आहे. त्यामुळेच हिवरे बाजारमध्ये शहरापेक्षा नीटनेटकेपणा अनुभवण्यास मिळाला. आज गावे बकाल होत चालली आहेत, फुगत चालली आहेत याचे मुख्य कारण रोजगार व पिण्याच्या पाण्याच्या असुविधा हे आहे. गावागावातील मतभेदांमुळे गावे दिशाहीन होताना दिसत आहेत परंतु हिवरे बाजार गाव गेली पंचवीस वर्षे अखंडितपणे काम करत आहे, पोपटराव पवार यांच्यासारखे दिशादर्शक नेतृत्व, कामातील पारदर्शकता व ग्रामस्थांचा सहभाग यामुळे हे गाव घडू शकले.
राजकीय माणसे गावांच्या विकासाचा विचार करतात पण राहतात शहरात, त्यामुळे त्यांचा विचार ना गावासाठी ना शहरासाठी असा आहे. महाराष्ट्रात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाऊस पडून सुद्धा ३१ मे ला राज्य तहानलेले दिसते परंतु हिवरे बाजार गावात आजही एक पंपात प्यायला पाणी मिळते ही कौतुकास्पद बाब आहे असे कुबेर म्हणाले. राळेगणसिद्धी व हिवरे बाजार या गावांच्या विकासाची केवळ चर्चा न करता प्रत्येक गावाने त्यांचे अनुकरण करावे, त्यासाठी पोपटरावांसारखे ध्येयवादी तरुण पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी एस.टी.पादीर यांनी आभार मानले. या वेळी महिला व पुरुष मोठय़ा संख्येने उपस्थित होते.