पद्मश्री मिळाल्याने शेती मार्गदर्शक पाळेकर आश्चर्यचकित
राज्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ज्वलंत असताना सरकारमध्ये कणव नावाची गोष्ट दिसत नाही. थातूरमातूर उपाय करायचे आणि मूळ कारणांपर्यंत पोहोचायचेच नाही, असेच आतापर्यंत घडत आले आहे, अशा परखड शब्दात यंदाचे पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेती मार्गदर्शक सुभाष पाळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्या शेतकऱ्यांनी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’चा स्वीकार केलेला आहे त्यापैकी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही, असा दावा देखील त्यांनी केला. आंध्रप्रदेशातील काकिनाडा येथून ‘लोकसत्ता’शी दूरध्वनीवरून बोलताना पाळेकर यांनी सरकारच्या धोरणाविषयी कडक शब्दात टीका केली.
ते म्हणाले, तुम्हाला शेतीतून १ लाख रुपये मिळत नाहीत. आम्ही तुमच्या कुटुंबाला ५ लाख रुपये देतो. तुम्ही आत्महत्या करा, असा संदेश सरकारला द्यायचा आहे का? मला याचे आश्चर्य वाटते. आपली जबाबदारी झटकण्याचेच काम सुरू आहे. सरकारी आकडेवारीवर आपला विश्वास नाही. आतापर्यंत ७ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, पण ज्या देशभरातील ४० लाख शेतकऱ्यांनी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ स्वीकारलेली आहे त्यापैकी एकानेही आत्महत्या केलेली नाही. आम्ही आत्महत्येमागची कारणेच नष्ट केली आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपला सत्कार केला आणि आमच्या प्रदेशाला दत्तक घ्या, अशी विनंती केली. तेथील सर्व शेतकऱ्यांनी ‘झिरो बजेट’ शेतीचा पर्याय निवडावा, असा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा कोणताही मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार आजवर आपल्यापर्यंत पोहोचला नाही, याची खंत वाटत नाही. कारण, आपण तशी अपेक्षाही केली नाही.
आपल्याला हा पद्मश्री पुरस्कार मिळाला, याचेच आश्चर्य वाटते. आपण कोणत्याही पक्षाचे, संस्थेचे सदस्य नाही, असे सांगून सुभाष पाळेकर म्हणाले, ज्यांना भुईमूग शेतात वर लागतात की खाली, हे माहिती नाही, ज्यांचा शेतीशी काहीही संबंध येत नाही, ते अहवाल सादर करतात आणि आत्महत्येमागची कारणे सांगतात. त्यांना वेळ मारून न्यायची आहे. मात्र, आपण देशभर फिरून अभ्यास केला आहे.
आपण पाच प्रमुख कारणे शोधली आहेत. त्यात शेती उत्पादन खर्चातील वाढ, त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज न फेडता येणे, मुला-मुलींच्या शिक्षण आणि विवाहाचा प्रश्न, बाजारात जाणीवपूर्वक शेतमालाचे भाव पाडण्याचे षडयंत्र, असे हे दुष्टचक्र आहे. त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ हाच पर्याय आहे.

‘एका गायीपासून ३० एकर शेती शक्य’
आम्हाला बाजारपेठेची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण, विषमुक्त अशा आमच्या शेती उत्पादनांना दुप्पट भाव मिळतो आणि त्यासाठी सरकारी यंत्रणेचीही गरज भासत नाही. सेंद्रीय (ऑर्गेनिक) शेती ही स्वदेशी नाही. त्यात आद्र्रतेची (ह्य़ुमस) निर्मिती होत नाही. सुपीकता नष्ट होते. ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ वाढतात. यात निविष्ठांचा खर्च अधिक आहे. अपेक्षित उत्पादन मिळत नाही. सेंद्रीय शेतीचे मोठे षडयंत्र आहे. मात्र, ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’कडे आता कल वाढत चालला आहे. दक्षिण भारतात तर चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. एका गायीपासून ३० एकर शेती केली जाऊ शकते, असे सुभाष पाळेकर म्हणाले.