|| सुहास सरदेशमुख

मराठवाडय़ातील ११ तालुक्यांमध्ये भूजल पातळी तीन मीटरने घटली

मराठवाडय़ातील धरणे तळ गाठत असताना भूजल पातळीही झपाटय़ाने घटत आहे. पाणीपातळीत तीन मीटरपेक्षा घट झालेले ११ तालुके आहेत. यापैकी बहुतांश तालुक्यांमध्ये साखर कारखाने तेजीत चालतील, असा सहकार विभागाचा अंदाज असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील लोहारा तालुक्याची भूजल पातळी ७.३८ मीटरने घटली आहे. या जिल्ह्य़ातील सर्व आठही तालुक्यांची भूजल पातळी सरासरी ४.१ मीटरने घटली आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात १६ साखर कारखाने आहेत. त्यातील १२ कारखाने या वर्षी सुरू होतील. अशीच अवस्था बीड जिल्ह्य़ातील भूजल पातळीची आहे. माजलगाव, भोकरदन आणि अंबड या तालुक्यांतील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा खाली गेली आहे. या तीनही तालुक्यांत साखर कारखाने आहेत. त्यामुळे उसाचे क्षेत्रही अधिक आहे. दुष्काळ असला तरी पाणीउपसा पद्धतशीरपणे झाला. पाऊस पडला नसल्याने भूजल पातळी दिवसेंदिवस उणेच दिसत आहे.

दुष्काळाची भीषणता वाढणार

मराठवाडय़ातला यंदाचा दुष्काळ अधिक भीषण असेल, असे सांगणारी आकडेवारी आता सरकारी यंत्रणा देऊ लागली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ८७६ विहिरींची पाणीपातळी मोजल्यानंतर त्याची मागील पाच वर्षांतील सप्टेंबरमधील पाणीपातळीच्या सरासरीशी तुलना केल्यानंतर आलेली आकडेवारी दुष्काळाची भीषणता सांगणारी आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, पैठण, सोयगाव आणि वैजापूर या तालुक्यांमध्ये सरासरी पर्जन्यमान ३० ते ५० टक्के कमी होते, तर खुलताबाद तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला. औरंगाबादसह मराठवाडय़ात जूनमध्ये १२ दिवस आणि जुलैमध्ये १६ दिवस पावसाचा खंड होता. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये २२ ते २६ दिवस पावसाचा खंड होता. त्यामुळे भूजल पातळीत घट झाल्याचे सांगण्यात येते.

ऊस पाणी खातो!

मराठवाडय़ातील पर्जन्यमानाचा गेल्या दहा वर्षांतील आलेख पाहिला असता सरासरी पर्जन्यमान असणारी दोन वर्षे असतात आणि पाच वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला जातो. २००८ ते २०१८ असा दहा वर्षांचा कालावधी गृहीत धरला तरी अशीच स्थिती आढळते. परिणामी भूजल पातळीत वाढ दिसत नाही. मात्र भूजल पातळीतील ही घट ऊस या पिकाशीही संबंधित आहे. सरासरीपेक्षा पाऊस अधिक झाला तरी ऊस लागवडीवर भर दिला जातो. विशेषत: दुष्काळी उस्मानाबाद, बीड आणि जालना या जिल्ह्य़ांमध्ये पावसाचे व्यस्त प्रमाण असतानाही ऊस लागवड केली जाते. कारण बहुतांश साखर कारखाने या जिल्ह्य़ांमध्ये आहेत. जालना जिल्ह्य़ात सहा साखर कारखाने आहेत. त्यातील समर्थ साखर कारखान्याची दोन युनिटे चालू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्यांचा कारभार चालतो, तर भोकरदनमध्ये रामेश्वर सहकारी साखर कारखाना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. जालना जिल्ह्य़ात ३० हजार हेक्टरवर ऊस उभा आहे. त्यातील २३ हजार हेक्टर ऊस अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांत आहे. अंबड आणि भोकरदन या दोन्ही तालुक्यांची भूजल पातळी तीन मीटरपेक्षा खाली गेली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परंडा तालुक्यात भैरवनाथ साखर कारखाना, तर लोहारा तालुक्यात लोकमंगल साखर कारखाना सुरू आहे. या दोन तालुक्यांची भूजल पातळी घटलेली आहे. हा कारखाना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उद्योगसमूहाचा आहे. लोहाऱ्याची भूजल पातळी मराठवाडय़ात सर्वाधिक घटलेली आहे. या जिल्ह्य़ात ४० लाख टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे नेते राणा जगजीतसिंह पाटील प्रवर्तक असलेला एक खासगी कारखाना, तर बीड जिल्ह्य़ात धनंजय मुंडे प्रवर्तक असलेल्या खासगी कारखान्याचा गळीत चाचणी हंगाम या वर्षी होण्याची शक्यता आहे. उसामुळे पाण्याचा उपसा वाढतो, त्यामुळे भूजल पातळी घटली आहे. बीड जिल्ह्य़ातील माजलगावची भूजल पातळी तीन मीटरने घटली असून येथील धरणातही शून्य पाणीसाठा आहे. तरीही माजलगाव परिसरात ऊस उभा आहेच.

५० टक्के कमी पर्जन्यमान 

खुलताबाद, देगलूर, भूम, परंडा, गेवराई, बीड, शिरूरकासार, धारूर या आठ तालुक्यांत सरासरी पर्जन्यमानापेक्षा अर्धाच पाऊस झाला, तर ३८ तालुक्यांमध्ये ३० ते ५० टक्के पावसाची तूट आहे.

मोठी तळीही कारणीभूत

भूजल पातळीत घट होण्यास मोठी तळीही कारणीभूत ठरत आहेत. काही तालुक्यांमध्ये बडय़ा शेतकऱ्यांनी १५ लाख लिटर क्षमतेची तळी बांधली आहेत. जेव्हा ओढे-नाले वाहत असतात तेव्हा तळ्यांमध्ये पाणी भरणे अपेक्षित असते. मात्र तसे होत नाही. विहिरींमध्ये जेव्हा पाणी असते तेव्हा उपसा करून ते शेततळ्यात साठवले जाते. त्यामुळे नंतर विहिरी कोरडय़ा पडतात. मराठवाडय़ातील बहुतांश भागात विहिरींनी तळ गाठला आहे.

ते ११ तालुके

भोकरदन, अंबड, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, परंडा, धारूर आणि माजलगाव अशा ११ तालुक्यांमध्ये भूजल पातळी तीन मीटरपेक्षा अधिकने घटली आहे.