बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होणार आहे. कारण, अजित पवार गटाकडून सुनित्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर, शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे रणांगणात असणार आहेत. नंनद-भावजयीच्या या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, दोन्ही उमेदवारांसाठी त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक कामाला लागले आहेत. तर, सुप्रिया सुळे यांच्या पाठी तर त्यांचं संपूर्ण कुटुंब सोबत आहे. एवढंच नव्हे तर अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे.

श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामतीतील उद्धट गावात त्यांनी आज प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंना मतदान करण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे. परंतु, सुप्रिया सुळे यांनी कधीच पवार नावाचा वापर केला नाही. त्यांना निवडून द्यायचं की नाही हा तुमचा सर्वस्वी अधिकार आहे. तुम्ही सर्वजण जाणते आहात. आज काय घडतंय हे प्रत्येकाला माहितेय. आज आपण मुखामध्ये श्रीराम म्हणतो. पण, घराघरात काय चालू आहे, हे सर्वांना माहियेत. रामायण चालू आहे की महाभारत सुरू आहे.

हेही वाचा >> Shrinivas Pawar: सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, श्रीनिवास पवार म्हणाले, “प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट..”

“जो तुमच्या ओळखीचा उमेदवार आहे, त्याला मतदान करण्याचं आवाहनही शर्मिला पवार यांनी केलं. त्या म्हणाल्या, अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा जो जाणकार आहे, माहितीचा उमेदवार त्याला मत द्या. सुप्रिया सुळे कोण आहेत, त्यांचं काम काय, त्यांच्याबरोबर काम करणारी लोक कोण आहेत, हे तुम्हाला माहितेय. त्यामुळे त्या लेकीला, माहेरवाशिणीला पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी विनंती करते”, असंही शर्मिला पवार म्हणाल्या.

दुसरीकडे बटन दाबलं तर…

“संसदेत जाऊन तुम्हाला बोलावंच लागतं. तुम्हाला आपल्या समस्या मुद्देसूद मांडाव्या लागतात. त्यमुळे त्या जर ते काम चांगलं करतायत त्यांना निवडून आणणं आपलं काम आहे. साहेबांनी आपल्याला काही त्रास दिलाय का. त्यांनी आपल्यावर प्रेमच केलंय ना इतके वर्षे. शेवटी काकांवर प्रेमच केलंय. काही ना काही दिलंय ना इतके वर्षे. एकही निवडणूक हरलेले नाहीत, आता त्या व्यक्तीला हरवायचं का. ते पाप आपण घडवायचं का. आपल्याला आपलं मन, दुसरीकडे बटन दाबलं तर चैन पडेल का रात्री. एकदा निर्णय़ घेतला की घेतला”, असंही त्या म्हणाल्या.