अंबरनाथ: तुमची जी मैत्री असेल, जे संबंध असेल ते सगळे २० तारखे नंतर. प्रतिपक्षातील कुणी तुम्हाला भेटत असेल तर त्यांना सांगा फोनवरून शुभेच्छा द्या, अशी स्पष्ट कानउघडणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी नुकतीच अंबरनाथमध्ये केली. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या होत्या. या भेटीची छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोरच भाजप जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेच्या सुनील चौधरी यांची कानउघडणी केली.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षांची भर सभेत कान उघडणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार बालाजी किणीकर निवडणूक लढवत आहेत. तर येथे शिवसेना ठाकरे गटाने राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात राजेश वानखेडे आणि मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील एकत्र आले होते. त्यांच्या या भेटीची शहरभर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचा नुकताच जन्मदिवस झाला. यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी चौधरी यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीची छायाचित्र संपूर्ण शहरात समाज माध्यमांवर प्रसारित झाले. त्यानंतर राजकीय तर्कवितर्क आणि चर्चांना उधान आले होते. याच पार्श्वभूमीवर महायुतीचा कार्यकर्ता मेळावा अंबरनाथमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी या भेटीवर अप्रत्यक्ष टिपणी केली. प्रतीपक्षातील कोणी तुम्हाला भेटण्यासाठी येत असेल तर त्यांना सांगा की फोनवरून शुभेच्छा द्या. आपली जी मैत्री, जे संबंध असतील ते सगळे २० तारखे नंतर. आता फक्त राजकारण, निवडणूक आणि महायुती, अशी कान उघाडणी नाना सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना केली. विशेष म्हणजे शिंदे गटाचे सुनील चौधरी सूर्यवंशी यांच्या शेजारीच बसले होते.

हेही वाचा : दिवा रेल्वे फाटकातील वाहन कोंडीमुळे  लोकल, एक्सप्रेस खोळंबल्या; शिळफाटा वाहन कोंडीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, आमची मैत्री असून राजेश वानखेडे भाजपात असताना आम्ही महायुती म्हणून सोबत काम केले आहे. अनेकदा ते आमच्या प्रचारासाठी आले आहेत. त्यांनी मित्र म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत, असा खुलासा शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना केला.