केंद्र सरकारने इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी हस्तांतरित करण्याचे संसदेत जाहीर झाल्यानंतर या निर्णयाचे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात विविध राजकीय पक्ष व संघटनांनी स्वागत केले आहे.
नाशिक शहर काँग्रेस समितीच्या वतीने या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, याकरिता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेच्या पावसाळी, हिवाळी अधिवेशनांत अनुक्रमे मुंबई व नागपूर येथे मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. केंद्र व राज्य शासनाकडे केलेला पाठपुरावा आणि त्यास देशातील सर्व खासदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व इतर मंत्री आणि आमदारांचे समर्थन मिळाल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याचे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी म्हटले आहे. आंबेडकरी जनतेचा मराठवाडा विद्यापीठाचा नामांतरानंतरचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. हा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुख्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीस कटारे यांच्यासह संपर्कप्रमुख राजन भालेराव, सरचिटणीस मनोहर दोंदे, ज्येष्ठ नेते मुकंद गांगुर्डे, उपाध्यक्ष पंढरीनाथ आव्हाड, संजय सानप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अत्याचारविरोधी कृती समितीनेही या निर्णयाचे स्वागत करून जिल्हाधिकाऱ्यांना आभाराचे पत्र दिले आहे. या स्मारकासाठी केंद्र व राज्य शासनाने एकत्रितपणे निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.