राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत आहेत. तसेच अमोल कोल्हेंचा मतदारसंघ शिरूरवर अजित पवारांनी लक्ष केंद्रित केलं आहे. महायुतीत शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याने अजित पवार यांनी या मतदारसंघात मोर्चेबांधणी चालू केली आहे. या मतदारसंघात अजित पवारांना तगडा उमेदवार मिळालेला नसला तरी त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आज शिरूर मतदासंघात (४ मार्च) सभा घेतली. यावेळी अजित पवार म्हणाले, अभिनेता धर्मेंद्र, गोविंदा, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीला उभे राहतात यांचा राजकारणाशी काय संबंध? या नटनट्यांचं राजकारणात काय काम? एखादा सेलिब्रिटी माणूस आला तर सुरुवातीला थोडे दिवस आपल्याला बरं वाटतं. दिसायला चांगला… मिशांना पिळ दिला… राजबिंडा गडी पाहिला की आपण ईव्हीएम मशीनचं बटण दाबून त्याला मत देतो. त्यांना उमेदवारी देऊन, प्रचार करून त्यात आमच्याही चुका झाल्या आहेत. आम्हाला काही लोकांच्या मनातलं ओळखता आलं नाही. आम्हाला वाटलेलं की हा (खासदार अमोल कोल्हे) चांगला निघेल. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय. हे कळायला काही मार्ग नाही.

दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे. कोल्हे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मला मागच्या निवडणुकीत (लोकसभा २०१९) शरद पवार यांनी संधी दिली. मी त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. माझी संसदेतील कामगिरी आणि त्या कामगिरीचा लेखाजोखा सर्वत्र उपलब्ध आहे. तो तुम्ही पाहू शकता. तसेच मी तुम्हाला ठामपणे सांगतो की मी जी भूमिका घेतली आहे त्यावर ठाम आहे आणि पुढेही त्या भूमिकेवर ठाम राहीन. शिरूर मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कटीबद्ध राहीन.

खासदार कोल्हे म्हणाले, अजित पवार मला सेलिब्रिटी उमेदवार म्हणून हिणवत आहेत. तसेच सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक होती असं त्यांनी सांगितलं. तसेच जेव्हा एखाद्या मतदारसंघात उमेदवार मिळत नाही तेव्हा तिथे सेलिब्रिटी उमेदवार दिला जातो असंही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, धर्मेंद्र या कलाकारांची उदाहरणं दिली. परंतु, मी एक गोष्ट सांगतो की, अजित पवारांनी ज्यांची उदाहणं दिली त्यातल्या एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडताना मला तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल, वेगवेगळे आरोप करत असाल तर मी नम्रपणे तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक असेल तर १०-१० वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप पाठवण्याचं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय?

हे ही वाचा >> “मविआबाबत आम्ही संभ्रमावस्थेत”, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्यात मतभेद…”

अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार सातत्याने दावा करत आहेत की, मी त्यांना राजीनामा देण्याबद्दल बोललो होतो. परंतु, मला त्यांना विचारायचं आहे की, या काळात मी संसदेत कधी अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं आणि माझ्या मतदारसंघातील प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? माझ्या कामाचा लेखाजोखा पाहिला तर एक गोष्ट मी आवर्जून नमूद करेन की. तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (सुनील तटकरे) हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संसदीय कामगिरीपेक्षा तुम्ही ज्याला सेलिब्रिटी म्हणून हिणवता त्या अमोल कोल्हेची कामगिरी कायमच उजवी राहिली आहे. हवं तर रेकॉर्ड तपासून पाहा.