पुण्यातील हिट अँड रनप्रकरणामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील अल्पयवीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे कोट्यधीश वडील आणि आजोबांनी शासकीय यंत्रणा आणि पुढाऱ्यांच्या मदतीने वेगवेगळे प्रयत्न केले. याप्रकरणी आरोपीचे वडील आणि आजोबा न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच आरोपीने मद्यप्राशन केलं नव्हतं हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करणे आणि खोटा अहवाल दिल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिंग विभागातील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अशातच या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटावर, त्यांच्या गटातील नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिसांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोन जप्त करून त्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. यावर अजित पवार म्हणाले, “मी नार्को टेस्ट देईन, पण मी त्यात दोषी आढळलो नाही तर अंजली दमानिया यांनी सामाजिक जीवनातून संन्यास घ्यावा. दमानिया यांची घरी बसण्याची तयारी आहे का?”

अजित पवार यांच्या या आव्हानावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया अजित पवारांना उद्देशून म्हणाल्या, “मी तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता ताबडतोब तुमची नार्को टेस्ट करून घ्या. त्या नार्को टेस्टमध्ये तुम्ही दोषी आढळलात तर काय करणार? हे देखील सांगा. तुम्ही जर त्या नार्को टेस्टमध्ये दोषी आढळला नाहीत तर मी सामाजिक आणि राजकीय जीवनातून संन्यास घेईन. तिथून पुढे कोणत्याही सामाजिक गोष्टीत सहभागी होणार नाही किंवा त्यावर बोलणार नाही. परंतु, तुमची नार्को टेस्ट करण्यासाठी पोलीस जी प्रश्नावली वापरणार की प्रश्नावली मी लिहून देणार.”

हे ही वाचा >> “सहा महिन्यांनी मोठा राजकीय भूकंप होणार”, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

दमानिया अजित पवारांना उद्देशून म्हणाल्या, “तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते माझ्याबद्दल जे काही बोललात, सुपारी घेणाऱ्या… रिचार्ज करून घेणाऱ्या… वगैरे, त्यानंतर मी तुम्हाला आणि तुमच्या लोकांना माझी माफी मागण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली आहे. मात्र तुमच्यापैकी कोणीही माझी माफी मागितलेली नाही. यावर आता मी अक्षरशाः तुमच्या विरोधात लढाई लढणार आहे. शक्य त्या सर्व कायदेशीर मार्गांनी मी तुमच्या विरोधात लढाई लढेन. माझ्या वक्तव्यानंतर तुमच्या पक्षातील पदाधिकारी सुरज चव्हाण, अमोल मिटकरी, उमेश पाटील हे तिघे जे काही बोलले ते चुकीचं होतं. मुळात त्यांची डोकी तेवढीच चालणार. आम्ही आमच्या नेत्यासाठी किती लढतो हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत राहणार.” अंजली दमानिया या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.