परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ते मुंबईत दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – राज्यात नव्या युतीची नांदी? श्रीकांत शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चेला उधाण

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

“ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. ज्यांनी अडीच वर्ष शेतकऱ्यांचे कधी अश्रू पुसले नाहीत. जे कधी घरातून बाहेर पडले नाही. ते आज आमच्यावर टीका करत आहेत, असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. खरं तर सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत देण्यात येत आहे. मात्र, काही लोकांच्या डोळ्यात ही मदत खूपत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “कुणी सांगितलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं?”, शरद पवारांची तुफान फटकेबाजी

“कोरोनाची दोन वर्ष वेदनादायी होती. आता नवीन सरकारने आपल्या सणांवरच्या सर्व मर्यादा काढल्या आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात राज्यात सांस्कृतीक कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे”, असे म्हणत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.