सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी अथक प्रयत्न करणारे माजी सेना नेते आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या वध्र्यात विना नियोजनाने पार पडलेल्या उत्स्फूर्त सभांची आठवण काढत आहेत. आता अन्य पक्षात असलेल्या या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या वध्र्यातील सभांनी जे स्फूरण मिळाले, त्याचा अनुभव परत झाला नाही, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली.
१८ ऑगस्ट १९८८ व २६ जानेवारी १९९५ मध्ये अशा बाळासाहेबांच्या दोन सभा वध्र्यात झाल्या. दोन्ही सभांच्या वेळी मीच प्रमुख आयोजक होतो, पण गर्दीसाठी कधीही जमवाजमाव करावी लागली नाही. सर्कस ग्राऊंडवर झालेल्या दोन्ही सभांना लाखावर उपस्थिती होती. आम्हाला गर्दी जमविण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागला नाही. सभास्थळी किल्लावजा व्यासपीठ केले,
तोच एक खर्च. १९८८ च्या सभेच्या वेळी पाऊस सुरू झाला, तेव्हा पळापळ होत असताना बाळासाहेब गरजले की वाघांनीच थांबावे.
शेळयामेंढय़ांनी पळ काढावा. सगळे शांत झाले. टपोऱ्या गारा बरसाव्या, तसे त्यांचे शब्द बरसू लागले. जमाव स्तब्ध झाला, असे जिल्ह्य़ात बाळासाहेबांचे व्यक्तिश: प्रेम लाभलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व आता भाजपचे जिल्हा परिषद सदस्य श्याम गायकवाड यांनी सांगितले. दुसरी सभा २६ जानेवारी १९९५ ला झाली. विधानसभा निवडणुकीदरम्यान ऐन गडबडीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. प्रजासत्ताकदिनीच सभा आयोजित केली म्हणून बाळासाहेब प्रचंड रागावले, पण लोकेच्छा म्हणून त्यांनी सभा संबोधित केली. त्यावेळी एकदिवस आधीच रात्री त्यांचे वध्र्यात आगमन झाले होते. तत्कालीन नगरसेवक बाळू वंजारी यांच्याकडे थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्वासोबतच त्यांनी जेवण घेतले. सकाळी सभा झाली. माझ्यावर त्यांनी निस्सिम प्रेम केले. मुंबईत गेल्यावर त्यांचे नित्य मार्गदर्शन मिळे.
गांधी जिल्ह्य़ात तुला शिवसेना वाढवायची आहे. त्यामुळे स्वस्थ बसू नकोस, असा त्यांचा सल्ला होता. भाजपकडे असणारा वर्धा विधानसभा मतदारसंघ त्यांनी केवळ माझ्या प्रेमापोटी शिवसेनेसाठी मागून घेतला होता.
तसे प्रेम मला आजवर कुण्या नेत्याकडून मिळाले नाही, असा अनुभव श्याम गायकवाड यांनी सांगितला.
सध्या काँग्रेसमध्ये असलेले तत्कालीन सेना नेते छोटू ढोणे म्हणाले, गावागावात शिवसेना वाढविण्याच्या नादाने आम्ही झपाटलो होतो. गावात पाटय़ापुरतीच सेना आहे, असे काँग्रेसवाले हिणवत.
या पाटय़ांनीच पुढे काँग्रेसची पाटीलकी संपवली. बाळासाहेबांच्या सभेसाठी उत्स्फू र्त गर्दी जमा होत असे. केवळ सभेच्या तारखेचा निरोप गेला की गावागावातल्या लोकांच्या झुंडी सभेसाठी येत. पदरचे पैसे खर्च करून शिवसैनिक भगव्या पताका, तोरणे, कमानी लावत. आज पैशाचा ओघ असूनही सभेसाठी कुठेच उत्स्फू र्तपणा दिसत नाही. आजच्या पाश्र्वभूमीवर त्यामुळेच बाळासाहेबांची महती कळून येते.