अशोक चव्हाण यांच्या भाजपात जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याबाबत राजकीय विश्लेषकांकडून विविध मते व्यक्त केली जात असतानाच आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे. तसेच शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून त्यांनी धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केलं. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

“अशोक चव्हाण भाजपात का गेले, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेसची ताकद घटली किंवा त्यांची वाढली असं दिसत नाही. असं असतं तर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती. अशोक चव्हाण जर मोठे नेते असते, तर त्यांना भाजपाच्या नेत्यांच्या सभेची गरज भासली नसती”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

हेही वाचा – धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका, “तुम्ही केलं की ते संस्कार आम्ही केलं की आम्ही गद्दार?”

धनंजय मुंडे यांनाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केलं. “तुम्ही पुलोद सरकार स्थापन केलं, ते संस्कार आणि अजित पवार महायुतीबरोबर गेले तर ते गद्दार? शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. यासंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर बोलावं हे योग्य नाही. शरद पवारांमुळेच ते मोठे झाले. त्यांना अशाप्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे हा धनंजय मुंडे यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र, कुणी असं काहीही बोललं तरी शरद पवार यांचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. शरद पवार यांनी नेहमीच आपला पुरोगामी विचार जपण्याचा प्रयत्न केला आहे.”

हेही वाचा – “प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ…” मंगळसूत्राच्या विधानावरून शिवसेना उबाठ…

महाविकास आघाडीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी विदर्भात महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. “विदर्भात महाविकास आघाडीची लाट आहे. जनता पूर्णपणे भाजपावर तसेच पंतप्रधान मोदींच्या विधानावर नाराज आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे”, असे ते म्हणाले.