लग्नाचे आमिष दाखवून आणलेल्या एका बांगलादेशी महिलेला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. खालापूर कोर्टाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एका दलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून बांगलादेशी महिलांची मुंबईलगतच्या परिसरात तस्करी सुरू आहे. बांगलादेशातून सुरुवातीला कोलकाता इथे आणि कोलकाता येथून नंतर मुंब़ई इथे या महिलांची तस्करी केली जात आहे. रायगड जिल्ह्य़ातील खालापूर इथे बांगलादेशी महिलेच्या अटकेनंतर ही बाब समोर आली आहे. जहनारा अब्दुल हकीम बिश्वास असे या महिलेचे नाव आहे. जाहनारा ही मूळची पाणीगती, जिल्हा खुलना बांगलादेशची राहणारी आहे.
तेवीस वर्षांच्या जाहनाराला लग्नाचे आमिष दाखवून दलालाने सुरुवातीला बांगलादेशातून केलकाता इथे आणण्यात आले. तिथून दुसऱ्या दलालाने तिला मुंबईत रवानगी केली. त्यानंतर तिला मुंबईतून पनवेलला आणण्यात आले. इथे दीड महिना वास्तव्य केल्यावर जहानाराला खालापूर येथील आपटी इथे राहणाऱ्या जयवंत शंकर मोरे याने तुझ्याशी लग्न करतो सांगत ताब्यात घेतले. त्यानंतर तिला खालापूर येथील कारगाव येथील दगडू मुसळे यांच्या घरी ठेवण्यात आले होते. रायगड पोलिसांच्या बांगलादेशी घुसखोर विरोधी पथकाला याचा सुगावा लागला. तेव्हा साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी सापळा रचून जाहनारा अब्दुल हकीम बिश्वास आणि जयवंत मोरे या दोघांना जेरबंद केले. दोघांनाही खालापूर कोर्टात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जाहनाराप्रमाणेच रायगड जिल्ह्य़ात आणखीन काही बांगलादेशी महिलांची तस्करी करण्यात आली आाहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
गेल्या १५ दिवसांत जिल्ह्य़ात १२१ संशयित बांगलादेशींची धरपकड करण्यात आली असून यातील ८२ जण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमधून आल्याचे सांगण्यात आले आहे, तर ३२ जण पश्चिम बंगालमधून आल्याचे समोर आले आहे. या सर्वाकडे भारतीय नागरिकत्वाचे पुरावे आहेत का, याचा तपास पोलीस सध्या करीत आहेत. जिल्ह्य़ात आठशे ते नऊशे बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती समोर आली आहे. या पाश्र्वभूमीवर हे कोम्ब्िंाग ऑपरेशन सुरू करण्यात आले असल्याचे मेश्राम यांनी सांगितले आहे. बांगलादेशींबद्दल काही माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.