मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरील भरती, पदोन्नती, वेतनश्रेणी आदींबाबत होणाऱ्या अन्यायासंबंधी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अनुसूचित जाती आयोगाचे राज्य समन्वयक डॉ. मदन कोठुळे यांनी शनिवारी येथे दिले.
अनुसूचित जातीच्या प्रकरणांत अनेक गुन्हे दाखल आहेत. पकी २१० गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. ४१५ प्रकरणांत निर्दोष सुटका झाली, तर ४०जणांना शिक्षा झाली. तसेच जि. प.च्या भरती, पदोन्नती व वेतनश्रेणी प्रक्रियेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर मोठय़ा प्रमाणात अन्याय झाला. या संबंधी अनेक तक्रारी आपल्यापर्यंत आल्या. जिल्हा दौऱ्यावर असताना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी विविध स्वरुपाची निवेदने देऊन न्याय देण्याची मागणी केली. या संदर्भात जि. प.चे सीईओ जवळेकर यांच्या कारभाराची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांबाबत योग्य ती कारवाई करावी व अहवाल १० दिवसांत अनुसूचित जाती आयोगास सादर करावा, असे लेखी आदेश आपण विभागीय आयुक्तांना दिल्याचे डॉ. कोठुळे यांनी सांगितले.
दरम्यान, गेवराई येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी तिच्या कुटुंबीयांची डॉ. कोठुळे यांनी भेट घेतली.