लातूर लोकसभा मतदारसंघात १० लाख ५४ हजार ६७७ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ६२.६८ इतकी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांनी पत्रकार बैठकीत दिली. मतदानाचा टक्का वधारल्याने निवडून कोण येणार, या विषयी पैजा लागल्या आहेत.
लातूर लोकसभा मतदारसंघातील लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६६.६८ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान लोहा विधानसभा मतदारसंघात ५८.५९ टक्के झाले. लातूर ग्रामीण मतदारसंघात १ लाख ५ हजार ६५८ पुरुष व ८५ हजार ११५ स्त्री मतदार असे १ लाख ९० हजार ७७३ जणांनी मतदान केले. लातूर शहर मतदारसंघात १ लाख २ हजार २४३ पुरुष, तर ८५ हजार ८०२ स्त्री मतदार असे एकूण १ लाख ८८ हजार ४५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ५८.९२ इतकी राहिली.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील ९९ हजार १७१ पुरुषांनी, तर ८० हजार ७१० स्त्री मतदारांनी असे एकूण १ लाख ७९ हजार ८८१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६३.६४ टक्के राहिली. उदगीर विधानसभा मतदारसंघात ९० हजार ३५ पुरुषांनी तर ७४ हजार ६७३ स्त्री मतदारांनी असे एकूण १ लाख ६४ हजार ७०८ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६२.३० टक्के इतकी राहिली.
निलंगा विधानसभा मतदारसंघात ९९ हजार ३३८ पुरुषांनी तर ८४ हजार २८८ स्त्री मतदारांनी असे एकूण १ लाख ८३ हजार ६२६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६५.९८ टक्के इतकी राहिली. लोहा विधानसभा मतदारसंघात ८० हजार २२९ पुरुष मतदारांनी तर ६७ हजार ४१५ स्त्री मतदारांनी असे एकूण १ लाख ४७ हजार ६४४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ५८.५९ इतकी राहिली. मतदारसंघात एकूण ५ लाख ७६ हजार ६७४ पुरुष मतदारांनी तर ४ लाख ७८ हजार ३ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदारांची टक्केवारी ६४.२२, तर स्त्री मतदारांची टक्केवारी ६०.९२ इतकी राहिली.
गुरुवारी झालेल्या मतदानाच्या वेळी एकूण १९ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यात लातूर ग्रामीणमधील ४, लातूर शहरातील १, अहमदपूरमधील २, उदगीरमधील, निलंग्यामधील ३ तर लोहय़ातील ३ मतदान यंत्रात बिघाड झाला होता. त्या ठिकाणी तातडीने दुसरे यंत्र बसवण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर मतदान पूर्ण झाले. लोहा शहरातील उस्माननगर मतदान केंद्रावर सायंकाळी ५.४५ वाजता मतदान यंत्र बंद पडले. त्यावेळी ३ मतदार केंद्रात मतदानासाठी उपस्थित होते. नवीन मतदान यंत्र मागवून रात्री ७.३५ वाजता तिघांनीही मतदान केले. उर्वरित एकाही ठिकाणी मतदान करताना कोणतीही अडचण आली नाही.
लातूर ग्रामीण विधासभा मतदारसंघातील उत्का या गावातील मतदान केंद्रावर सर्वाधिक ८७.०८ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी चिंचोलीराववाडी मतदान केंद्रावर ४५.९४ टक्के मतदान झाले. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील हणमंतवाडी या मतदान केंद्रावर सर्वाधिक ८३.२० टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी शहरातील सिंचनभवन मतदान केंद्रावर ४१.६५ टक्के मतदान झाले. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील दगडवाडी येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक ८७.५० टक्के मतदान झाले, तर टाकळगाव येथील मतदान केंद्रावर ०.६६ टक्के इतके निचांकी मतदान झाले. उदगीर विधानसभा मतदारसंघातील जायबाची वाडी या मतदान केंद्रावर सर्वाधिक ९५.२२ टक्के मतदान झाले, तर उदगीर शहरातील समतानगर येथे सर्वात कमी ४२.३३ टक्के मतदान झाले. निलंगा विधानसभा मतदारसंघातील हंगरगा येथे सर्वाधिक ८१.३० टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी दवणहिप्परगा येथे ६२.५३ टक्के मतदान झाले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील झालेल्या मतदानाच्या सरासरीच्या १५ टक्के जास्त किंवा १५ टक्के कमी मतदान झालेल्या २०० केंद्रांची तपासणी निवडणूक निरीक्षकांनी केली. लातूर शहरात चार मतदान केंद्रांवर पाचजणांनी व अहमदपूर मतदारसंघातील दोन मतदान केंद्रांवर दोघांनी टेंडर व्होट केले. लातूर शहरातील शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये सर्व मतपेटय़ा सील करून ठेवण्यात आल्या असून त्या ठिकाणी चोवीस तास कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याची चोवीस तास निगरानीही नोंदवली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.