कथित नक्षलवादी समर्थकांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर देशभरातून पुणे पोलिसांच्या कारवाईचा निषेध होत आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले असतानाच राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. पोलीस पुराव्यांशिवाय कारवाई करत नाही. आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, असे केसरकर यांनी म्हटले आहे.

बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांना अटक केली. सुधा भारद्वाज या कामगार नेत्या असून गौतम नवलाखा हे ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल वीकली’चे सल्लागार संपादक आहेत. वरवरा राव हे तेलंगणमधील प्रख्यात कवी आहेत. या अटकसत्राचा निषेधही होत आहे.

सुप्रीम कोर्टातही या प्रकरणी याचिका दाखल झाली आहे. मानवाधिकार आयोगानेही या कारवाईत पुणे पोलिसांनी नियमावलीचे पालन केले नाही, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस पुराव्यांशिवाय कारवाई करत नाही. आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच ते नक्षलवाद्यांचे समर्थन कसे करु शकतात, हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे का?, असा प्रश्न त्यांनी अटकसत्राला विरोध करणाऱ्यांना विचारला.