सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस आता राजकारणाचा आणि चर्चेचा विषय ठरले आहेत. या चर्चेत उडी घेत राज्यातील पोलीस दलाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या भाजपा नेत्यांना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चिमटे काढले आहेत.

सचिन सावंत यांनी ट्विट करुन भाजपावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, “बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्यामुळे पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या पोलिसांना ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक भाजपा नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना!”

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील पोलीस दलांमधील कर्मचारी-अधिकाऱ्यांना चांगल्या कामगिरीसाठी विशेष पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात येते. त्यानुसार, यंदा बिहारच्या पोलिसांना प्रथमच एकही पदक जाहीर झाले नाही, पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या पोलिसांना ५८ पदकं जाहीर झाली. यावरुन सचिन सावंत यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलीस-महाराष्ट्र पोलीस वादात उडी घेत महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांवर टीकास्त्र सोडलं.

सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा ठाकरे सरकारने मलीन केली असा आरोप नुकताच भाजपाचे नेते राम कदम यांनी केला होता. राम कदम यांनी या प्रकरणात संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. भाजपाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नुसते आरोप करु नयेत तर पुरावे द्यावेत असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. या मुद्यावरुन भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेवर आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. एवढंच नाही तर ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली असाही आरोपही केला होता. तसंच सुशांत सिंह प्रकरण ठाकरे सरकार सीबीआयकडे का सोपवत नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.