राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट घेत जवळपास दोन तास चर्चा केली. या बैठकीनंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उदयनराजे नाराज नसून, भाजपात जाणार नसल्याची माहिती दिली. मात्र आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मी आणि मुख्यमंत्री उदयनराजेंच्या संपर्कात असून ते भाजपात येतील याबद्दल आशावादी असल्याचं सांगितलं आहे. याबद्दल उदयनराजे यांनी मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे उदयनराजे नेमकं काय करणार आहेत याबद्दल अद्यापही तर्क वितर्क लढवले जात आहेत.

पुण्यात चंद्रकांत पाटील गणपती विसर्जनासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे यांच्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “उदयनराजे यांच्याशी मुख्यमंत्री आणि माझा संवाद सुरू आहे. दोन दिवसांपुर्वी जवळपास एक तास चर्चा झाली. यावेळी त्यांनी मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलायचं असल्याने सांगितल्याने दोन दिवस पुढे गेले. सर्वांना सोबत घेऊन जाण्यास ते प्राधान्य देतात. आम्ही आशावादी आहोत की उदयनराजे भाजपमध्ये येतील”.

शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली. उदयनराजे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात जवळपास दोन तास बैठक सुरु होती. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे मुद्दे आणि रणनीतीवर चर्चा करण्यात आली. उदयनराजेंची कोणतीही नाराजी नाही. ते पक्षातच असून बाहेर जाण्याची चर्चा झालेले नाही. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाहीत. मात्र भाजपच्या गोटातून माध्यमांच्या माध्यमातून ही चर्चा केली जात आहे. जनतेचे मत इतर समस्यांवरून इतरत्र वळवण्यासाठी भाजपानं असे प्रयत्न सुरू केलेत”.