सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्याच गैरसमजात रहावे असं प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन मिळत नसल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:चे अपयश लपविण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणे, याला काय म्हणायचे? अशी विचारणा केली असून केंद्र सरकार आजही सर्व ती मदत देण्यास तत्पर असल्याचं सांगितलं आहे.

“रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला ५२५ ट्रेन देण्यात आल्या आहेत, ज्यामधून ७ लाख ३० हजार श्रमिकांनी प्रवास केला आहे. जितक्या ट्रेन मागितल्या जात आहेत, त्यामध्ये स्वत: रेल्वे मंत्री लक्ष घालत असून ट्रेन पुरवत आहेत. अनेकदा रात्री उशिरा यादी पाठवल्यानंतरही ट्रेन दिल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री तसंच इतर शिवसेना नेत्यांनी केलेलं वक्तव्य पूर्ण राजकारण आहे. आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप वाईट आहे. देशातील ३० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्र सरकार पूर्पणपणे अपयशी ठरलं आहे. सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत असून हे चुकीचं आहे. रेल्वे मंत्री आणि मंत्रालयाने महाराष्ट्राला वारंवार मदत केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे. जनतेच्या वेदनांची परिसीमा होते, तेव्हा विरोधी पक्ष हाच त्यांचा आवाज असतो आणि त्या वेदना दूर होत नाहीत, तोवर संघर्ष करणे, हेच आमचे संस्कार आहेत. आमचा संघर्ष आणि आवाज असाच सुरू राहील, कानावरचे राजकीय पडदे काढायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रविवारी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत असल्याचं सांगत त्यांनी केंद्राकडून होणाऱ्या दिरंगाईवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी रेल्वेगाड्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय रेल्वमंत्री पियूष गोयल यांनी लागलीच उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं. एका तासात आवश्यक माहिती द्या, तुम्हाला हव्या तितक्या रेल्वेगाड्या उपलब्ध करून देऊ असं ट्विट त्यांनी केलं. यावर लगेचच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावत ट्रेनही जिथे पोहोचवायची आहे तिथेच पोहोचू असा टोला लगावला. यामुळे सध्या भाजपा आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरु आहे.