भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. ‘माझ्यासह २५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती,’ असेही हर्षवर्धन यांनी म्हटले.

‘महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या महिन्यात एका भेटीवेळी भाजप प्रवेशासाठी ५ कोटींची ऑफर दिली होती. माझ्यासह २५ आमदारांना भाजपकडून ही ऑफर देण्यात आली. पक्षात आल्यास निवडणुकीचा खर्च भाजपकडून करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते,’ असे औंरगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे आमदार असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

‘भाजपकडून पक्षप्रवेशासाठी ५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. पैसे घ्या, पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि भाजपकडून निवडून या, अशी ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवल्यास त्याचा सर्व खर्च भाजपकडून केला जाईल. या निवडणुकीत पराभूत झाल्यास २०१९ मध्ये विधानपरिषदेवर संधी देण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते,’ अशी माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. गेल्या महिन्याच्या २७-२८ तारखेला मुंबईतील चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीवेळी ही ऑफर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून शिवसेनेच्या सर्वच आमदारांना अशा प्रकारची ऑफर देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामधील विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रृत आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाराचादेखील वापर केला आहे. या दोन्ही नेत्यांकडून सातत्याने एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जातात. त्याचा फटका शिवसेनेला बसताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते.